एल निनोच्या संकटाला तोंड देण्यासाठी जलसंधारणाची कामे युद्धपातळीवर, 30 जूनपर्यंत कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
राज्यात एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणारी पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने आतापासूनच उपाययोजनांना वेग दिला आहे. आगामी पावसाळ्यापूर्वी म्हणजेच 30 जून 2027 पर्यंत राज्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी मृद व जलसंधारण, कृषी, ग्रामविकास आणि महसूल यांसह विविध विभागांच्या समन्वयातून कामे करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे
राज्यात जलसंधारणाच्या कामांना अधिक गती देण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱयांचीही मदत घेतली जाणार आहे. स्वतंत्र मृद व जलसंधारण विभागाच्या स्थापनेनंतर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट नाला बांध, पाझर तलाव आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार यांसारखी कामे वेगाने सुरू आहेत. आता मर्यादित कालावधीत अधिकाधिक गावांपर्यंत ही कामे पोहोचविण्यासाठी उपलब्ध यंत्रणेचा एकत्रित वापर केला जाणार आहे. मृद व जलसंधारण आणि कृषी हे दोन्ही विभाग शेतकऱयांच्या हितासाठी परस्परपूरक आहेत.
जिओ-टॅगिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
जलसंधारणाच्या कामांमध्ये गुणवत्ता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ‘जलदर्पण’ पोर्टल, एमएच-यूआयडी आणि जिओ-टॅगिंगसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱयांनाही या प्रणालींचे प्रशिक्षण आणि कामांच्या तांत्रिक प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन मृद व जलसंधारण विभागाकडून दिले जाणार आहे.
Comments are closed.