जेट्टीअभावी पद्मदुर्ग किल्ल्यावर पर्यटकांच्या जिवाला धोका, भरती-ओहोटीच्या वेळी दुर्घटनेची भीती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ऐतिहासिक पद्मदुर्ग (कासा) किल्ल्यावर जेट्टीची सुविधा नसल्याने पर्यटकांना किल्ल्यावर चढउतार करताना मोठा धोका पत्करावा लागत आहे. पर्यटकांची सुरक्षितता आणि किल्ल्याचे संवर्धन लक्षात घेऊन पद्मदुर्ग किल्ल्यावर तातडीने जेट्टी उभारावी, अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांकडून होत आहे. थेट धक्क्याची सोय नसल्याने पर्यटकांना मोठ्या बोटीतून लहान बोटीत किंवा खडकांवरून कसरत करत जीव धोक्यात घालून उतरावे लागते. भरती-ओहोटीच्या वेळी दुर्घटनेची भीती असते.

मुरुड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था, कोकण कडा मित्र मंडळ, रायगड व सर्व संलग्न शिवप्रेमी संस्थांच्या वतीने 2 जानेवारी रोजी पद्मदुर्ग जागर सोहळा साजरा होणार आहे. पद्मदुर्ग जागर सोहळा गेली 17 वर्षं पद्मदुर्ग किल्ल्यात साजरा करण्यात येत असून यंदा 18वे वर्ष आहे. या सोहळ्याच्या आधी तरी पद्मदुर्ग किल्ल्यावर ये जा करण्यास तात्पुरती जेट्टी उभारण्याची मागणी पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण समितीचे अध्यक्ष अशिलकुमार ठाकूर यांनी केली आहे.

तटकरेंना आश्वासनाचा विसर

पद्मदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी जेट्टी नसल्याने दुर्गप्रेमी व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षी या ठिकाणी झालेल्या पद्मदुर्ग जागर सोहळ्यात आमदार अनिकेत तटकरे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्या माध्यमातून जेट्टी उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र या आश्वासनाचा तटकरेंना विसर पडल्याबद्दल पर्यटकांमध्ये नाराजी आहे.

Comments are closed.