पालिका प्रशासन अखेर नमले, शालेय दैनंदिनीत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. आंबेडकरांचे छायाचित्र प्रसिद्ध होणार
मुंबई महापालिकेच्या शालेय दैनंदिनीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र वगळल्याबद्दल विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि भीमसैनिक संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयावर धडक देत जाब विचारला होता. यानंतर पालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र आणि त्यांचे मौलिक विचार छापण्याचा निर्णय घेतला आहे.
पुस्तिकेमध्ये महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. सर्वपल्ली राधापृष्णनन आणि डॉ. एपीजे अब्दुल कलाम या थोर व्यक्तींचे छायाचित्र शिक्षण प्रेरक म्हणून प्रसिद्ध केले असतानाच ज्या डॉ. आंबेडकरांना या पुस्तिकेतून वगळण्यात आले होते. याची दखल घेत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि नगरसेविका माधुरी मांजरेकर यांनी शेकडो भीमसैनिकांसह शिक्षणाधिकारी डी.एन किरतपुडवे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन धारेवर धरले होते. तसेच छायाचित्र प्रसिद्ध न केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा दिला होता. यासंदर्भात 5 ऑक्टोबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन समन्वय समितीनेदेखील पत्र दिले होते. या सर्व बाबींचा विचार करत पालिका प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मौलिक विचार छायाचित्रासह छापण्यास मंजुरी दिली आहे.
Comments are closed.