महापालिकेची आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर…जोगेश्वरीच्या ट्रॉमा केअरमध्ये रुग्णांची हेळसांड, सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी
जोगेश्वरी येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये रुग्णांची होणारी गैरसोय आणि उपचारात येणाऱया अडचणींसंदर्भात शिवसेनेने तीव्र आवाज उठवला आहे. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल कर्मचाऱयांची मोठी कमतरता असून रुग्णांची हेळसांड होत आहे. नुकतेच एका आठ वर्षांच्या मुलीचा मलेरियाने मृत्यू झाला. तिच्यावर नीट उपचार झाले नसल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच याप्रकरणी बेजबाबदार उत्तरे देणाऱया मेडिकल सुपरिटेंडंटविरोधात कारवाईची मागणी शिवसेनेने केली आहे.
शिवसेना नगरसेवक अंकित प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करत बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमधील आरोग्य व्यवस्थाच कशी व्हेंटिलेटरवर आहे याकडे लक्ष वेधले आहे. रुग्णालयात काही दिवसांपूर्वी अक्षिता पाटील (8 ) आणि त्याआधी जिया गौतम (12) या मुलींचा मलेरियाने मृत्यू झाला. अक्षिता पाटील हिची आई आरोग्यसेविका असून त्यांनी मुलीला उपचार नीट मिळत नसल्याचे डॉक्टर, नर्स यांना सांगितले होते. याप्रकरणी मेडिकल सुपरिटेंडंटने मुजोरीची उत्तरे लोकप्रतिनिधींच्या माणसांना दिली होती. अशा मानसिकतेच्या अधिकाऱयांवर कारवाई करा, अशी मागणी अंकित प्रभू यांनी केली आहे. अनेक नर्स, डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ जिवाची पर्वा न करता काम करतात, पण त्यांच्यावर प्रशासनात बसलेले अधिकारी त्यांना नीट काम करून देत नाहीत, असा आरोप प्रभू यांनी केला. त्यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवण्यात आला आहे.
डॉक्टर, नर्सची पदे तत्काळ भरा
बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर रुग्णालयावर पालिका दरवर्षी 70 ते 80 कोटी रुपये खर्च करते. रुग्णालयात सध्या तीन आयसीयू असून त्यापैकी एक सुरू आहे. त्यात फक्त दहा बेड्स आहेत.
एपूण 306 बेड्स असून 77 डॉक्टर काम करतात. एसआर, एचओ, एएमओ वाढवण्याची गरज.
160 नर्सिंग कर्मचारी असून फक्त 80 कार्यरत. लहान बालकांसाठी अतिदक्षता विभाग म्हणजे एकही एनआयसीयू नाही. त्याची फाईल अनेक दिवसांपासून अडकली आहे. हृदयरोगाशी संबंधित तपासण्या करण्याची सुविधा नाही. नेत्ररोग विभाग अनेक वर्षांपासून बंद. कर्मचारी पगार, पीएफ, इन्शुरन्ससंदर्भातील समस्यांनी त्रस्त.
Comments are closed.