शेतकऱ्यांना वसुलीसाठी नाडणाऱ्या फायनान्स कंपन्यांची खैर नाही, राज्य शासनाने केंद्रीय गृहखात्याला यादीच पाठवली
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना फायनान्स कंपन्यांनी कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नये असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. त्यानंतरही अनेक कंपन्या शेतकऱ्यांच्या मागे वसुलीसाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आहेत. अशा कंपन्यांची यादी राज्य शासनाने थेट केंद्रीय गृहखात्याकडे पाठवल्यामुळे या कंपन्यांवर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. दुष्काळी परिस्थितीत ज्या फायनान्स कंपन्या कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहेत किंवा बळजबरी करत आहेत त्यांची माहिती मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना दिली आहे. फायनान्स कंपन्यांनी माणुसकी ठेवून शेतकऱ्यांना सहकार्य करावे आणि वसुलीसाठी सक्ती करू नये, अन्यथा सरकारला या कंपन्यांबाबत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अग्रीम मदतीबाबत बोलताना कृषिमंत्री भरणे यांनी आतापर्यंत राज्यातील सुमारे 97 लाख शेतकऱ्यांना ही अग्रीम रक्कम मिळाली असल्याचा दावा केला. ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेच्या प्रलंबित हप्त्याची फाईल मंजुरीसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आली असून ती रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने नुकतेच एनडीआरएफच्या नुकसानभरपाईच्या दरांमध्ये वाढ केली आहे. या वाढीव दरांनुसार शेतकऱ्यांना जास्तीची मदत मिळावी यासाठी राज्य सरकारने आधी पाठवलेल्या प्रस्तावात दुरुस्ती करून सुधारित फेरप्रस्ताव पेंद्राकडे पाठवण्याचे काम सुरू आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
Comments are closed.