90 चेंडू ही छोटी गोष्ट नाही, सामना ड्रॉ करण्याचा निर्णय अनाकलनीय; गिल-गंभीरच्या रणनीतीवर हरभजन सिंग याची टीका

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात 15 षटके शिल्लक असताना हिंदुस्थान सामना अनिर्णित करण्याचे मान्य केल्याच्या निर्णयावर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंगने प्रश्न उपस्थित केले आहेत. अखेरच्या 90 चेंडूंमध्येही विजयासाठी प्रयत्न करायला हवे होते, असे मत त्याने व्यक्त केले.

हिंदुस्थ आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका अनिर्णित राहिल्यानंतर हरभजनने हिंदुस्थानी संघाच्या रणनीतीवर नाराजी व्यक्त केली. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यात 15 षटके म्हणजेच 90 चेंडू शिल्लक होते. या कालावधीत गोलंदाजी करून प्रतिस्पर्धी संघाच्या विकेट मिळवण्याचा प्रयत्न करता आला असता, असे त्याचे म्हणणे आहे.

“या सामन्याबद्दल आधीच खूप चर्चा झाली आहे. डाव घोषित करताना 15 षटके शिल्लक होती, हा मुद्दाही अनेकांनी उपस्थित केला. माझ्या मते, 90 चेंडू ही छोटी गोष्ट नाही. त्या चेंडूंमध्ये विजयासाठी प्रयत्न करायला हवे होते. कदाचित निकाल आपल्या बाजूने लागला असता,” असे हरभजन म्हणाला. मुंबईत पत्रकारांशी बोलताना त्याने ही भूमिका मांडली.

ऑस्ट्रेलियन संघाला सर्व काही माहीत होते

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चेंडू छेडछाडीच्या (बॉल टॅम्परिंग) प्रकरणावर हरभजन सिंगने पुन्हा एकदा भाष्य केले आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाशी संबंधित घडलेल्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात संपूर्ण संघाला याची माहिती असावी, असे मत त्याने व्यक्त केले.

रिव्हर्स स्विंगसाठी पाकिस्तान आणि हिंदुस्थानच्या गोलंदाजांकडे अनेकदा संशयाने पाहिले गेले. मात्र, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांमध्येही चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकार घडले आहेत. चेंडू नैसर्गिकरीत्या रिव्हर्स स्विंग होण्यासाठी वेळ लागतो. मात्र, सामन्याच्या दहाव्या षटकातच चेंडू रिव्हर्स स्विंग होऊ लागल्यास त्यामागे काहीतरी अनैसर्गिक प्रकार असण्याची शक्यता असल्याचे त्याने सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या बॉल टॅम्परिंग प्रकरणाबाबत बोलताना हरभजन म्हणाला, “संघातील एका खेळाडूला काय घडत आहे, याची इतरांना माहितीच नव्हती, असे म्हणणे शक्य नाही. एकाच घरात राहत असताना आपल्या भावंडांना काय सुरू आहे, याची माहिती नसणे शक्य नाही. माझ्या मते, संपूर्ण संघाला याची कल्पना होती. संघात अशी घटना घडत असेल, तर ती सामूहिक बाब असते.”

Comments are closed.