मुंबई हादरली! माहीममध्ये ज्वेलर्सवर गोळीबार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. पुण्यात आज न्यायालयाबाहेर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर काही तासांतच मुंबईत थरकाप उडवणारी घटना घडली. माहीम येथील पी. सी. जैन या ज्वेलर्स दुकानावर गोळीबार करण्यात आला. दुचाकीवरून आलेले दोन हेल्मेटधारी गोळय़ा झाडून पळून गेले. यात कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात खळबळ उडाली.

माहीमच्या एल. जे. मार्गावर शोभा हॉटेलच्या रांगेत पी. सी. जैन हे ज्वेलर्सचे दुकान आहे. संध्याकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास वांद्रय़ाहून माहीमच्या दिशेने एका दुचाकीवरून दोघे हेल्मेटधारी आले. त्यांनी शोभा हॉटेलच्या सिग्नलवर यू-टर्न घेतला. त्यानंतर दुचाकी फुटपाथवर घेऊन हळूहळू ते पी. सी. ज्वेलर्स दुकानासमोर थांबले. त्यावेळी मागे बसलेल्या व्यक्तीने दोन गोळय़ा झाडल्या व त्यानंतर दोघेही पसार झाले. गोळय़ा दुकानाच्या काचेवर लागल्या. गोळीबार झाला तेव्हा दुकानात मालक भरत जैन आणि हेल्पर नामदेव हे दोघे होते. त्यांना कसलीही इजा झाली नाही. गोळीबार झाल्याचे कळताच परिसरात घबराट पसरली. माहीम पोलीस व गुन्हे शाखेच्या पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

मागे वळलो आणि हादरलो

ज्वेलर्सला लागूनच असलेल्या भारत सर्व्हिस सेंटरचा मालक रुपेश गेहलोत हे दुकानासमोरच्या फुटपाथवर मोबाइलवर बोलत उभा होते. मी समोर तोंड करून उभा होतो तेव्हा मागे अचानक फटाक्यांचा आवाज आला. सुरुवातीला कोणी तरी फटाके फोडले असे वाटले. पण मागे वळून पाहिल्यावर गोळीबार झाल्याचे कळले आणि हादरून गेले. हल्लेखोर दुचाकीवरून पळून जातानाही दिसले, असे त्यांनी सांगितले.

दोन महिन्यांत चौथी घटना

  • 17 ऑक्टोबर – माटुंगा येथील चार रस्ता येथे कारवर गोळीबार
  • 18 ऑक्टोबर – जुहू येथे टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार
  • 11 नोव्हेंबर – व्ही. बी. नगर येथे गोळीबारात एकाचा मृत्यू
  • 25 नोव्हेंबर – माहीम येथे ज्वेलर्सवर गोळीबार

Comments are closed.