गुजरातमध्ये जळगावच्या तीन मजुरांना कालव्यात फेकले, रोजगाराच्या शोधात निघालेल्या कुटुंबावर हल्ला
पोट भरण्यासाठी रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये गेलेल्या जळगावच्या सहा मजुरांना सूरतमध्ये कालव्यात फेकून दिल्याची काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱया या घटनेत पती-पत्नीसह नऊ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून, दोन वर्षांचे लहान बाळ तसेच एक 16 वर्षांचा मुलगा बेपत्ता आहे. एका 13 वर्षांच्या मुलाने पाईपला पकडून स्वतःचा जीव वाचवला. याच मुलाने जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन सगळा प्रकार सांगितला. दरम्यान, या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सूरत पोलिसांनी सांगितले.
जळगावच्या एरंडोल तालुक्यातील पाटील कुटुंब 21 नोव्हेंबर रोजी मजुरीसाठी जळगावहून कारने सुरतकडे निघाले होते. सुरत जिल्हय़ातील बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ दुसऱया कारमधून आलेल्या चार जणांनी पाटील यांची गाडी अडवली आणि त्यांना उकाई काकरापार डाव्या कालव्यात चक्क फेकून दिले. फेकून देण्यात आलेल्या सहा जणांपैकी 13 वर्षांच्या करण पाटील पाईप पकडून पोहत कालव्याच्या बाहेर आला. जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन त्याने सगळी आपबीती कथन केली. हॉटेल चालकाने सुरत पोलिसांना ही माहिती कळवली.
सुरत पोलिसांनी कालवा ढवळला
करण याने दिलेल्या माहितीवरून उकाई काकरापार कालवा ढवळून काढला असता सहा जणांपैकी नितीन पाटील, त्यांची पत्नी कविता तसेच नऊ वर्षांची मुलगी स्वीटी यांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले. तर दोन वर्षांचा मुलगा प्रथमेश आणि हरीश या दोघांचा अद्याप शोध घेण्यात येत आहे.
- नितीन पाटील यांच्या कुटुंबाला कालव्यात फेकणाऱयांची ओळख पटली असून ते या कुटुंबाच्या परिचित असल्याचे सुरत ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी सांगितले. या प्रकरणी खंडियो, अभो, बंटी तसेच अन्य एकावर गुन्हा दाखल केला आहे.
- पाटील कुटुंब हे एका विमा घोटाळय़ाचे साक्षीदार होते. याच कारणावरून त्यांना कालव्यात फेकण्यात आले असावे अथवा जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा संशय आहे.
Comments are closed.