फिक्सर… तानाजी सावंत, अब्दुल सत्तारांसह 3 मंत्र्‍यांची नावे; अमोल मिटकरींचे OSD वर गंभीर आरोप

अकोला : मंत्रालयातील फिक्सर आणि दलालांना यापुढे मंत्र्‍यांच्या  ओएसडी आणि स्वीय सहायक म्हणून स्थान नसणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. मंत्र्‍यांचे ओएसडी आणि स्वीय सहायक ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्‍यांचा आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीसांनी 13 नावे या यादीतून वगळ्याने मंत्रालयात व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. फडणवीस यांनी मंत्रालयात सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेचे आमदार अमोल मिटकरी यांनी कौतुक करत स्वागत केलंय. मात्र, कालच शिवसेना शिंदे गटाचे माजी मंत्री संदीपान भुमरे यांच्या ओएसडींवर गंभीर आरोप केल्यानंतर आता अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी आणखी 3 मंत्र्‍यांची नावे घेतली आहेत. या मंत्र्‍यांच्या ओएसडींकडून देखील आपणास असाच त्रास झाल्याचे मिटकरी यांनी म्हटले. तर, माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी विवेक मोगल यांचे नाव घेत गंभीर आरोप केले आहेत.

काल राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी ‘एबीपी माझा’शी बोलतांना तत्कालीन रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांच्या ओएसडीसंदर्भात मोठा गौप्यस्फोट केला होता. 5 कोटींच्या एका कामासाठी आपल्याला भुमरेंच्या खात्यातील एका ओएसडीने पाच लाखांची मागणी केल्याचा खळबळजनक आरोप आमदार मिटकरी यांनी केला होता. या आरोपांवर काहीही बोलायला संदिपान भुमरे यांनी नकार दिलाय. दरम्यान, आज ‘एबीपी माझा’शी बोलतांना आमदार अमोल मिटकरी यांनी काही नवे गौप्यस्फोट केले आहेत.

महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात मंत्री असलेल्या संदिपान भुमरे यांच्यासोबतच तत्कालीन आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, पाटबंधारे मंत्री संजय राठोड आणि कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या ओएसडीसंदर्भातही असेच अनुभव आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळेच यातील अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत आज मंत्रिमंडळात नाहीत, असं ते म्हणाले. माजीमंत्री संदीपान भुमरे यांच्या संबंधित ओएसडीचं नाव घेणं आमदार मिटकरी यांनी टाळलं. पण, तत्कालीन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचे ओएसडी असलेले विवेक मोगल यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांनी गंभीर आरोप केले आहेत. अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नेमलेल्या राज्यपाल नियुक्त नावांमध्ये मोगल यांनी आर्थिक व्यवहार केल्याचा गंभीर आरोप मिटकरी यांनी केला. मोगल यांनी विदर्भाच्या विद्यापीठावर विदर्भा बाहेरचे प्रतिनिधी नेमल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच, मंत्री संजय राठोड, माजी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरे यांच्या खात्यातील ओएसडी आणि इतर लोकांचे अनुभवही चांगले नसल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला आहे. दरम्यान, आपल्या मतदारसंघात हजारो कोटींची विकास कामे केल्याचा दावा करणाऱ्या आमदारांना हा निधी कसा मिळतो?, हेही एकदा विचारा, असा टोला मिटकरी यांनी लगावला.

https://www.youtube.com/watch?v=t_ya7alm7ka

राष्ट्रवादीत लवकरच इनकमिंग

अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या नेत्यांचे इनकमिंग होणार असल्याचे सुतोवाच अमोल मिटकरी यांनी केले आहेत. महाविकास आघाडीतील अनेक पक्षातील आमदार आणि खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राला लवकरच ही नावे कळणार असून शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक आमदार, खासदार अजित दादांना भेटून गेल्याचं त्यांनी सांगितलं. माजी आमदार विजय भांबळे, राहुल मोटे आणि राहुल जगताप यांच्या संदर्भात लवकरच निर्णय होणार आहे. या संदर्भात महायुतीतील इतर मित्र पक्षांचीही मत लक्षात घेतली जातील, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज अन् दमलेल्या बापाची व्हिसासाठी वणवण; मंत्र्यांच्या दरवाजे झिजवूनही पदरी निराशा

अधिक पाहा..

Comments are closed.