विधानपरिषदेसाठी भाजपचे 3 शिलेदार ठरले; संभाव्य नाराजीनाट्य टाळण्यासाठी शिंदेंचा सावध पवित्रा
मुंबई: राज्यातील विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यामध्ये दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी देण्यात आली आहे. येत्या 27 मार्च रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महायुती सरकारमध्ये या पाचपैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला येणार आहे. या तीन जागांसाठी भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. भाजपकडून विधानपरिषद उमेदवारांच्या दिल्लीला पाठवण्यात आलेल्या अंतिम यादीत दादाराव केचे, संजय केणेकर आणि संदीप जोशी यांना संधी मिळाली आहे.
दरम्यान, भाजपकडून विधानपरिषदेचे तीनही उमेदवार भाजपच्या नरीमन पॉइंट येथील कार्यालयात पोचतायत. रिक्त झालेल्या एकूण 5 जागांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला आल्या आहेत, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक जागा असणार आहे. अशातच उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे उद्या (17 मार्च) शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडुन कुणाची वर्णी लागते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
संभाव्य नाराजीनाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदेंचा सावध पवित्रा
दुसरीकडे विधानोरिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता एकनाथ शिंदे सावध पाऊले उचलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आज नाव जाहीर झाल्यास होणारं नाराजी नाट्य टाळण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा ऐनवेळी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उमेदवार थेट उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. दरम्यान आज नाव जाहीर करण्यात यावं अशी पक्षातील नेत्यांची इच्छा आहे. मात्र याबाबत अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेणार असल्याचं समजतंय.
शिवसेनेच्या वाट्याला एक जागा, इच्छुक मात्र अनेक
नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे. तर शिवसेनेकडून माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत असून सातत्याने उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर आक्रमकपणे टीका करणारं नेतृत्व ही शीतल म्हात्रे यांची सध्याची ठळक ओळख आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांचं नाव चर्चेत आहे. संजय मोरे हे एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. संजय मोरे हे ठाण्याचे माजी महापौर आहेत. नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाचीसुद्धा चर्चा सुरू आहे. किरण पांडव हे विदर्भातील एकनाथ शिंदे यांचे मजबूत शिलेदार आहेत.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.