सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली; औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे?, एकनाथ शिंदे संतापले!
मराठी On Harshwardhan Sapkal: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली होती. औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, असं विधान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या विधानाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खरपूस समाचार घेतला आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना केली. हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली, काय केलं म्हणून त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली?, औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे, जनाची नाही तर मनाच तरी ठेवा, असा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. तसेच औरंगजेबची कबर ही महाराष्ट्राला लागलेलं कलंक आहे. हा कलंक पुसला पाहिजे ही लोकांची भावना आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभा परिसरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
नागपूरमधील घटना पूर्वनियोजित कट- एकनाथ शिंदे
नागपूरमध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही लोकं जिवानीशी वाचली. पोलिसांवर दगडफेक झाली. काही लोक जखमी झाले. ही घटना पूर्वनियोजित होती असे दिसतंय, असं एकनाथ शिंदे म्हणाले. ज्या मोमीनपुरामध्ये घटना घडली तिथे एरवी अनेक गाड्या पार्क असायच्या, मात्र काल त्या नव्हत्या. काही मंदीरातील फोटो जाळले. अग्निशमन दलाच्या जवानांवर हल्ले केले. पोलिसांवर दगडफेक करणं हे दुदैवी आहे. समाजकंटकांना शोधून कडक कारवाई होईल. नागपूर हे शांतता प्रिय शहर आहे. दोन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. पोलीस मूळाशी जाऊन तपास करतील. आपण सर्वांनी सहकार्य करावं शांतता राखावी, असं आवाहन एकनाथ शिंदेंनी केलं. हा औरंगजेब या आंदोलनकर्त्याचा कोण लागतो. या आंदोलनकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे, छावा पाहिला पाहिजे. त्याचं समर्थन करणं म्हणजे देशद्रोह्याचं समर्थन करणं आहे. देशाचा द्रोही त्याचं समर्थन म्हणजे देशद्रोहचं समर्थन, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हर्षवर्धन सपकाळ नेमकं काय म्हणाले होते?
औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीस देखील तेवढेच क्रूर आहेत. ते धर्माचा आधार घेत आहेत. औरंगजेबाची कबर उचलून टाका, असं सांगत आहेत. याचा अर्थ त्यांना मराठी माणसांचा, मावळ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे. औरंगजेबाची कबर ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष आहे. क्रूर प्रवृत्तीच्या माणसाला आम्ही गाडतो, हे त्या ठिकाणी दिसून येते, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते.
संबंधित बातमी:
सकाळी 10 च्या हेडलाईन्स, VIDEO:
अधिक पाहा..
Comments are closed.