Ajit Pawar … नाहीतर तुमची जागा रोबोट घेईल, मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना अजित पवारांचा चिमटा
मुंबई : प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ आजपासून 5 ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. टेकवारी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांना उद्देशून भाषण करताना नॅपकिन, मिसळ आणि उद्घाटन कात्रीवरून चिमटा काढला. यावेळी, कर्मचाऱ्यांनाही हसू आवरले नाही. तर, उद्घाटन करण्यासाठी चक्क रोबोटने अजित पवारांना कात्री आणून दिली, त्याचा संदर्भ देत नीट काम करा नाहीतर तुमच्या जागी रोबोट येईल, असा चिमटा अजित पवारांनी मंत्रालयीन (Mantralay) कर्मचाऱ्यांना काढला.
येथील कार्यक्रमात स्वागतावेळी टॅावेल आकाराची शॅाल दिली, त्यावरून अजित पवारांनी टोला लगावला. टॉवेल आकाराची शाल दिली नसती तरी परवडलं असतं. किती काटकसर चालली आहे ते मी बघत होतो, आपलंच सरकार आहे, असे अजित पवार यांनी म्हणताच हशा पिकला. कॅबिनेटच्यावेळी आहाराचा विचार व्हायला हवा. फक्त मिसळच दिली जाते. आता मी सुजाता सौनिक यांना सांगणार आहे की, पुढच्यावेळी आहाराची जबाबदारी व्ही. राधा यांना सांगा, असे अजित पवार यांनी म्हटले. मी कार्यक्रमाला आलो तर आज वेळेत कात्री मिळाली. नेहमी कात्री शोधावी लागते. पण, आज रोबोटने बरोबर कात्री आणून दिली. बघा किती बरोबर काम रोबोट करतोय ते. त्यामुळे तुम्ही पण नीट काम करा, नाहीतर तुमच्या सगळ्यांची जागा पण रोबोटच घेईल, अशा शब्दात अजित पवारांनी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमातून चिमटे काढले.
काय आहे टेक वारी
प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी, प्रशिक्षण संस्कृती निर्माण करण्यासाठी “टेक वारी : महाराष्ट्र टेक लर्निंग वीक’ आजपासून दि. 5 ते 9 मे दरम्यान मंत्रालयात साजरा करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता(AI), ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा, कार्यशाळा व विचारमंथनाच्या प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आहे. ‘टेक वारी’ म्हणजे महाराष्ट्र शासन आयोजित पहिली डिजिटल वारी होय. आधुनिक तंत्रज्ञान व नवीन कल्पनांचा संगम असून ‘टेक वारी’ ही मंत्रालयातून सुरू होऊन महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांच्या कानाकोपऱ्यात तंत्रज्ञानाचा प्रसार करुन त्यामधून आधुनिक तंत्रस्नेही महाराष्ट्र घडविण्याची सुरुवात आहे. या ‘टेक वारी’ मध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, ब्लॉकचेन, सायबर सुरक्षा इत्यादी तंत्रज्ञानाबाबत सत्रे तसेच तणाव व्यवस्थापन, आरोग्यदायी जीवनशैली, ध्यानधारणा याबाबतच्या कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हे सर्व कार्यक्रम टेक वारीच्या पहिल्या दिवशी दि. 5 मे रोजी मंत्रालयातील त्रिमुर्ती येथे ‘प्रभावी व तणावमुक्त जीवन’ या विषयावर प्रभु गौर गोपाल दास मार्गदर्शन करत आहेत.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.