माथेरानच्या घाटातील संरक्षक भिंत कोसळली; डोंगरही खचू लागला, परिसरातील गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मुसळधार पावसामुळे निसर्गरम्य माथेरानच्या घाटातील संरक्षक भिंत आज सकाळी कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डोंगरही खचू लागल्याने पसिरातील गावकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नेरळ ग्रामपंचायत हद्दीतील लव्हाळीवाडीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यालगत ही घटना घडली. विशेष म्हणजे घाट रस्त्याच्या संरक्षणासाठी उभारलेली भिंतच ढासळल्याने डोंगराचा काही भागदेखील खचू लागला आहे. संरक्षक भिंतीलगत असलेली जुनी झाडेदेखील पडण्याची भीती आहे. लवकरात लवकर दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

माथेरानचा घाटरस्ता सुरक्षित राहावा यासाठी वनविभागाच्या वतीने ही भिंत बांधली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस पडत असल्याने मातीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. याशिवाय घाट रस्त्यावर सतत वाहनांची वर्दळ असल्याने अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. हा दाब वाढत गेल्याने भिंत कोसळल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे. याच ठिकाणापासून थोड्याच अंतरावर असलेल्या सुरक्षा भिंतीचा काही भाग पडला होता. त्यावेळी मातीचा मोठा मलबा लव्हाळीवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर आल्याने ग्रामस्थांचा संपर्कच तुटला होता. कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने अशा घटना घडत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

  • पुन्हा दुसऱ्या ठिकाणी सुरक्षा भिंतीला मोठे भगदाड पडल्याने माथेरान घाट रस्त्याच्या सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक असून मुसळधार पाऊस कायम राहिल्यास आणखी पडझड होण्याची भीती व्यक्त होत आहे.
  • वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी घाट रस्त्याची सुरक्षा तपासावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

..तर पर्यटनाला फटका
माथेरानच्या घाटातील सुरक्षा भिंतीचे त्वरित मजबुतीकरण कर करणे गरजेचे आहे. तसे केले नाही तर मोठी दुर्घटना घडून डोंगरावर जाण्याचा मार्गच बंद होऊ शकतो. तसे झाल्यास कुणीही पर्यटक माथेरानला जाऊ शकणार नाही. त्याचा मोठा फटका पावसाळ्यातील पर्यटनाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments are closed.