बीडीडी पुनर्विकास प्रकल्पांतील घरांसाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट माफक असावी, आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील वरळी, नायगाव आणि ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतील घरांसाठी आकारण्यात येणारे बांधकाम शुल्क (कन्स्ट्रक्शन कॉस्ट) माफक असावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

1 जानेवारी 2011 नंतर बीडीडी चाळींमधील पोलीस निवासस्थानांमध्ये वास्तव्य केलेल्या पोलीस परिवारांना घरे दिली जाणार आहेत. पोलीस आयुक्तांनी वरळी बीडीडीतील 123, नायगाव बीडीडीमधील 84 तर ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळीतील 16 अशा 223 पोलीस परिवारांना बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांमध्ये 500 चौरस फुटांची घरे गृहनिर्माण विभागाने ठरवलेला बांधकाम खर्च आकारून मालकी तत्त्वावर देण्यात यावीत असा शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. उर्वरित 315 सदनिका पोलीस आयुक्तांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. वरळीतील सदनिकांसाठी 1 कोटी 48 लाख रुपये, नायगावमधील सदनिकांसाठी 72 लाख 25 हजार तर ना. म. जोशी मार्गावरील सदनिकांसाठी 86 लाख 30 हजार रु पये बांधकाम शुल्क ठरवण्यात आले आहे.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये या अवाजवी बांधकाम शुल्काबद्दल सवाल उपस्थित केला आहे. 2011 नंतरच्या पोलीस परिवारांना बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात घरे देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यासाठी शिवसेनेनेदेखील मागणी केली होती. परंतु सदनिकांसाठी ठरवलेले बांधकाम शुल्क एका सदनिकेसाठी आहे की वरळीतील संपूर्ण बीडीडी चाळ प्रकल्पासाठी, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. हे न परवडणारे बांधकाम शुल्क काही ठरावीक परिवारांसाठीच आहे. म्हाडाला त्यातून कोणताही विशेष फायदा किंवा नुकसान होणार नाही. त्यामुळे तिन्ही प्रकल्पांमधील सदनिकांसाठी कन्स्ट्रक्शन कॉस्ट माफक असावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी पत्रात केली आहे.

Comments are closed.