पावसाळ्यापूर्वी पागडी इमारतींची दुरुस्ती करा, आदित्य ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
धोकादायक उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा आणि पावसाळ्यापूर्वी तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई शहरात 13 हजार 500 हून अधिक उपकरप्राप्त (सेस) पागडी इमारतींचा पुनर्विकास, सेक्शन 79 (अ) व 79 (ब) संदर्भातील न्यायालयीन स्थगितीमुळे पूर्णपणे ठप्प झाला आहे. यातील अनेक इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत असून यामध्ये राहणारे भाडेकरू अत्यंत असुरक्षित परिस्थितीत जीवन जगत आहेत.
पावसाळ्यापूर्वी या इमारतींची दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे, याकडे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.
विशेष बाब म्हणून विचार करा
दुरुस्तीच्या कामांसाठी म्हाडाला 4000 प्रति चौ. मी. एवढाच खर्च करण्याची परवानगी आहे. त्यामुळे विशेष बाब म्हणून सहानुभूतीपूर्वक विचार करून इमारतींच्या दुरुस्तीकरिता म्हाडातर्फे निधी द्यावा व तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली.
Comments are closed.