लग्नात आधी जेवणावर ताव मारला नंतर दागिन्यांवर हात साफ केले, तिघांना पोलिसांनी केली अटक
मस्त छान कपडे घालून वऱ्हाडी बनून लग्न सोहळ्यात घुसायचे. मंडपात असलेल्या जेवणावर ताव मारायचा, मग टार्गेट ठरवून त्यांचा किमती ऐवज चोरायचा. अशा प्रकारे लग्नसोहळय़ात हात साफ करून पसार होणाऱया तिघांना विनोबा भावे पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. त्यांनी देवनार, कुर्ला आणि कोपरखैराणे येथे लग्न सोहळ्यात केलेल्या तीन गुन्ह्यांची उकल केली आहे.
पिंपरी-चिंचवड येथे राहणाऱ्या रेश्मा गोरखा (43) यांच्या मुलाचा कुर्ल्याच्या होली क्रॉस स्कूलजवळील जश्ने बॅन्क्वेट हॉल येथे लग्नसोहळा आयोजित केला होता. मुलाच्या लग्नातच रेश्मा यांचे 12 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक लाख 25 हजार रोख रक्कम असलेली बॅग गायब झाली. शोधाशोध करूनही न मिळाल्याने आपला ऐवज चोरीला गेल्याची खात्री होताच त्यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल होताच वरिष्ठांच्य मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी, उपनिरीक्षक अमर चेडे, पिसाळ तसेच भोसले, महाजन साबळे, सांगळे, नरबट या पथकाने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक बाबींचा अभ्यास व खबऱ्यांना कामाला लावण्यात आले. तेव्हा अशा प्रकारे चोरी करणारे तिघे नाशिक येथील एका धर्मशाळेत असून ते लग्नाच्या हॉलची रेकी करत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार चेडे व पथकाने नाशिक गाठून प्रशांत सिसोदिया, राज सिसोदिया या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला पकडले. चौकशीत त्यांनी रेश्मा यांचे दागिने व रोकड चोरल्याची कबुली दिली. शिवाय देवनार व कोपरखैराणे येथेदेखील लग्नसोहळ्यात हात साफ केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन गुन्ह्यांची उकल करत सहा लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.
रेल्वे स्थानकावर आसरा
तिन्ही आरोपी मध्य प्रदेशचे राहणारे आहेत. मुंबईत आल्यावर ते रेल्वे स्थानकावर आसरा घेतात. दिवसा लग्नाच्या हॉलची रेकी करून मग छान कपडे घालून लग्नसोहळय़ात घुसतात. तेथील चमचमीत जेवणावर ताव मारून सोन्याचे दागिने किंवा रोकड कोणाकडे आहे ते हेरून हातसफाई करतात. मग चोरलेला ऐवज घेऊन पसार होतात, अशी त्यांची मोडस ऑपरेंडी असल्याचे सांगण्यात येते.
Comments are closed.