यंदा अहिल्यानगर महापालिकेत कोणाचा महापौर?, बदललेलं समीकरण अन् सध्या राजकारणाची A टू Z माहिती
अहिल्यानगर महानगरपालिका बातम्या : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. सध्या राज्यातील बहुतांश महानगरपालिकांमध्ये प्रशासक राज असून, लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असल्याने इच्छुक उमेदवारांसह सर्वसामान्य नागरिकांमध्येही मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन पक्ष सहभागी असल्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
2023 मध्ये कार्यकाळ संपलेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक कार्यरत आहेत. त्यामुळे येथील महानगरपालिका निवडणूक विशेष लक्षवेधी ठरणार आहे. 2003 साली स्थापन झालेल्या अहिल्यानगर महानगरपालिकेत गेल्या 20 वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांचे महापौर झाले आहेत. आज पक्षीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलली असली, तरी आपल्याच पक्षाचे जास्त नगरसेवक निवडून येतील आणि महापौरपदही आपल्यालाच मिळेल या आत्मविश्वासाने आघाडी व युतीतील सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
अहिल्यानगर महापालिकेचा इतिहास आणि कार्य (Ahilyanagar Municipal Corporation History) –
सुमारे 500 वर्षांपूर्वी स्थापन झालेलं, पूर्वी अहमदनगर म्हणून ओळखलं जाणारं आणि आता नामांतरानंतर अहिल्यानगर झालेलं हे शहर इतिहास, संस्कृती आणि राजकारणाचं महत्त्वाचं केंद्र मानलं जातं. दक्षिण आणि उत्तर भारताचा प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या या शहराला छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या मोठ्या शहरांचा शेजार लाभलेला आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने शहर फार मोठं नसलं, तरी महानगरपालिका होण्यासाठी आवश्यक निकषांमध्ये अहिल्यानगर पूर्णतः बसतं. शहराची लोकसंख्या सुमारे पाच लाखांच्या आसपास असून, मतदारसंख्या सुमारे 3 लाख 7 हजार आहे. स्वातंत्र्यापासूनच राजकीयदृष्ट्या प्रभावी मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या सर्वच पक्षांचे वजनदार नेते आहेत.
अहिल्यानगर शहरावर आजवर कोणत्याही एका पक्षाचं एकहाती वर्चस्व राहिलेलं नाही. सातत्याने वेगवेगळ्या पक्षांची सत्ता शहराने अनुभवली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, वीज, घनकचरा व्यवस्थापन, शाळा, आरोग्य सुविधा यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर काम करणाऱ्या महानगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्यासाठी सर्वच पक्ष नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. प्रत्येक निवडणुकीतच नव्हे, तर निवडणुकीनंतर महापौर निवडीसाठीही राजकीय समीकरणे बदलताना पाहायला मिळाली आहेत. 2003 साली नगर परिषदेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर राज्यातील जवळपास सर्व प्रमुख पक्षांचे महापौर या शहराने पाहिले आहेत.
आतापर्यंत कोण कोण झाले महापौर? (Ahilyanagar Municipal Corporation Mayors List)
- 2003 ते 2008 – भगवान फुलसौंदर (शिवसेना), संदीप कोतकर (काँग्रेस)
- 2008 ते 2013 – संग्राम जगताप (राष्ट्रवादी), शीला शिंदे (शिवसेना)
- 2013 ते 2018 : संग्राम जगताप (राष्ट्रवादी), अभिषेक कळमकर (राष्ट्रवादी), सुरेखा कदम (शिवसेना)
- 2018 ते 2023 – बाबासाहेब वाकळे (भाजप), रोहिणी शेंडगे (शिवसेना)
अहिल्यानगर महापालिकेतील पक्षीय बलाबल (Party-wise strength in Ahilyanagar Municipal Corporation) –
अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक डिसेंबर 2018 मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत शिवसेनेने 24 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून स्थान मिळवले होते. राष्ट्रवादी काँग्रेस 18 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर होती, तर भाजपने 14 जागा मिळवत तिसरे स्थान पटकावले होते.
संख्याबळात तिसऱ्या क्रमांकावर असतानाही भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर महापौर पद मिळवले. भाजपचे बाबासाहेब वाकळे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महापौर झाले. यामागे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी भाजपला दिलेला पाठिंबा निर्णायक ठरला. या घटनेनंतर संग्राम जगताप यांच्यासह संबंधित नगरसेवकांवर शरद पवार यांच्याकडून शिस्तभंगाची कारवाई होणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र पुढे प्रत्यक्षात अशी कोणतीही कारवाई झाली नाही.
2018–23 या कालावधीतील पक्षीय बलाबल – (एकूण नगरसेवक : 68)
- शिवसेना – 24
- राष्ट्रवादी काँग्रेस – १८
- भाजप – 14
- काँग्रेस – 5
- बसपा – ४
- समाजवादी पक्ष – १
- इतर – 2
2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन झाली. त्यानंतर 2020 साली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला सहकार्य केले आणि शिवसेनेच्या रोहिणीताई शेंडगे या अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर झाल्या. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर महानगरपालिकेतील नगरसेवकांचे पक्षीय समीकरणही मोठ्या प्रमाणावर बदलले.
सध्याचे बदललेले पक्षीय बलाबल
- भाजप – 19
- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – 0
- राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – 18
- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) – 1
- शिवसेना (शिंदे गट) – 21
- काँग्रेस – 3
- समाजवादी पक्ष – १
- बसपा – ३
- अपक्ष – 2
सध्याचं राजकारण (Ahilyanagar Municipal Corporation Current politics)-
2018 च्या महानगरपालिका निवडणुकीनंतर अहिल्यानगरच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल घडून आले आहेत. शहराच्या राजकारणात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये फूट पडल्याने महानगरपालिकेतील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक अजित पवार गटाकडे, तर शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे गेल्याने महाविकास आघाडीतील सत्ताधारी नगरसेवकांची संख्या आता अवघ्या एक-दोनवर येऊन ठेपली आहे. मात्र, असे असले तरी आगामी निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनेही कंबर कसली असून ती ताकदीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे.
राजकीय विश्लेषक विठ्ठल लांडगे काय म्हणाले?
निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याआधीच सर्वच पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, युती आणि आघाड्यांमध्ये प्रत्येकी तीन-तीन पक्ष असतानाही इच्छुक उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. यावरून आगामी निवडणुकीतील राजकीय स्पर्धेची तीव्रता स्पष्ट होते, असे मत राजकीय विश्लेषक विठ्ठल लांडगे यांनी व्यक्त केले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.