मराठा समन्वयकांकडून बीड बंद मागे; अजित पवारांचा जिल्हा दौरा, पंकजा मुंडे, धनंजय मुंडेही उपस्थित
बीड : मारहाण आणि गु्न्हेगारी टोळींच्या व्हिडिओने गाजत असलेल्या बीडमध्ये (Beed) पुन्हा एकदा जबर मारहाणीची घटना घडली आहे. शिवराज दिवटे या युवकास वाल्मिक कराडच्या टोळीतील पोरांनी मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा राज्यात चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलणी केली असून आता स्वत: अजित पवार बीड दौऱ्यावर जात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या तीर्थक्षेत्र विकास योजनेची आढावा बैठक होणार असून मंत्री पंकजा मुंडेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. अजित पवार (Ajit pawar) उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर असून येथील विविध विकास कामांची परळीत पाहणी करणार आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून उद्या बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मराठा समन्वयकांकडून देण्यात आली आहे. मात्र, अजित पवारांच्या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या ज्योतिर्लिंग स्थान असलेल्या वैद्यनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच परळी औद्योगिक औष्णिक केंद्राचे सादरीकरण यासंदर्भात शासकीय विश्रामगृह येथे बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मंत्री पंकजा मुंडे,आमदार धनंजय मुंडे हे देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीआधी अजित पवार, मंत्री पंकजा मुंडे,धनंजय मुंडे हे वैद्यनाथाचे दर्शन घेऊन तदनंतर तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करतील. त्यामध्ये मंदिराच्या पूर्व द्वारासमोर असलेली दगडी कमान क्यू कॉम्प्लेक्स हरिहर तीर्थ, साऊंड अँड लाईट शोची जागा, प्रदक्षिणा मार्ग, मेरू गिरी उद्यान ही कामे केली जात आहेत.या कामांची ते पाहणी करणार असून परळीतल्या बैठकीनंतर ते अंबाजोगाईकडे रवाना होणार आहेत.
बीड बंद मागे
बीड जिल्ह्यातील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, उद्या होणारा बंद स्थगित करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सर्व समाज बांधवांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याने बीड जिल्हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली. त्यामुळे, बीड जिल्ह्यात उद्या कुठलाही बंद पाळण्यात येणार नाही.
हेही वाचा
उस्मानभाईंनी जीवापाड जपलं, मेहताबभाईंनीही जीवाला जीव दिला; निष्ठा जपत अख्ख्या कुटुंबाने दिली आहुती
अधिक पाहा..
Comments are closed.