अजित दादांचा विदर्भ भाजप अन् देवेंद्र फडणवीसांचा बालेकिल्ला असल्याचे मानण्यास नकार? म्हणाले….
अजित पवार नागपूर : विदर्भ प्रत्येक वेळेस कोणाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही. विदर्भाने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे निकाल दिल्याचे आजवरचे अनुभव आहे, हे सूचक वक्तव्य केले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) यांनी. त्यामुळे दादांचा विदर्भ भाजप आणि फडणवीस यांचा बालेकिल्ला असल्याचे मानण्यास नकार आहे का? दादांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विदर्भात जास्त वाटा हवा आहे का? असे अनेक प्रश्न या निमित्याने आता उपस्थित केले जात आहे.
विदर्भ देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला आहे आणि त्या विदर्भातूनच राष्ट्रवादी काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पूर्वी आपल्या चिंतन शिबिरांना सुरुवात करत आहे. यामागे काहीही खास रणनीती आहे का? असा प्रश्न अजित दादांना विचारण्यात आला होता. आणि तेव्हा दादांनी विदर्भ कुठल्या एका पक्षाचा बालेकिल्ला आहे, असं मानण्यास नकार दिलाय.
विदर्भाने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे निकाल दिल्याचे आजवरचे अनुभव- अजित पवार
विदर्भ कुठल्या एका पक्षाचा बालेकिल्ला राहीलच असं नाही. विदर्भाने वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये वेगवेगळे निकाल दिल्याचे आजवरचे अनुभव असल्याची आठवण यावेळी अजितदादांनी आवर्जून करून दिली. आज भाजप देश आणि राज्य पातळीवरील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. आज विदर्भात सर्वच पक्ष आपापल्या परीने काम करत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी सारखे मातब्बर भाजप नेते विदर्भातले असल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक यांच्या दृष्टिकोनातून मोठी अपेक्षा आहे. त्याच पद्धतीने एकनाथ शिंदेंचा शिवसेना पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे की, आपल्याला जास्त संधी मिळाली पाहिजे. तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून समन्वय साधण्याचा प्रयत्न करू असेही अजितदादा यावेळी म्हणाले.
महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न?
विशेष म्हणजे काल (18 सप्टेंबर) दुपारी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद झाली असता त्यांनाही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पश्चिम महाराष्ट्र असताना पक्षाचा पहिला चिंतन शिबिर विदर्भात का? असे प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा तटकरे यांनी विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगली संधी असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने आठ ठिकाणी उमेदवार दिले आणि त्यापैकी सात जिंकून आले. विदर्भात आमचा ट्रेक रेकॉर्ड 90% आहे, असं सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे दोघेही विदर्भातील चिंतन शिबिराची कारणमीमांसा करताना राष्ट्रवादी काँग्रेसला विदर्भात मोठी संधी आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकसाठी महायुतीमध्ये राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करण्याचा आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त जागा आपल्या कार्यकर्त्यांच्या पदरात पाडून घेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं म्हणता येईल. असेही जाणकारांचे म्हणणं आहे.
https://www.youtube.com/watch?v=go-ks6xlv44
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.