सर्व ‘कडू सत्य’ अजितदादांना माहित होते; रुपाली चाकणकरांचा राजीनामा आधीच मागितलेला पण तटकरेंनी.
पुणे : नाशिकमध्ये भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणात अडचणीत सापडलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावरती विरोधकांसह त्यांच्याच पक्षाच्या नेत्या रूपाली ठोंबरेंनी हल्लाबोल केला आहे. रूपाली ठोंबरे (Rupali Thombre) यांनी चाकणकरांवरती गंभीर आरोप केला आहे. रूपाली ठोंबरे पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यावर आणि दिवंगत नेते अजित पवार यांच्या भूमिकेवर अत्यंत खळबळजनक वक्तव्ये केली आहेत.
रूपाली ठोंबरे यांनी म्हटलंय की, सर्व ‘कडू सत्य’ अजित दादांना माहित होते. अजित दादांनी चाकणकर यांचा राजीनामा आधीच मागितला होता. जेव्हा अजित दादांनी चाकणकरांचा राजीनामा मागितला होता, तेव्हा सुनील तटकरे यांनी तो राजीनामा थांबवला, असा गंभीर आरोप ठोंबरे यांनी केला आहे.
“अजित दादा असते तर छडीने सरळ केले असते”
अजित दादा आज आपल्यात नाहीत, पण जर ते असते तर त्यांनी या लोकांना ‘छडीच्या तालावर’ सरळ केले असते, असे त्या संतापून म्हणाल्या. अजित दादांना त्यांच्या शेवटच्या काळात कोणी कोणी आणि कशा प्रकारे घेरले होते, ते कोणामुळे वैतागले होते, या सर्व गोष्टी आपण येणाऱ्या काळात नावानिशी जाहीर करणार आहोत, असा इशारा त्यांनी दिला. जे दादांना जिवंत असताना करता आले नाही, ते त्यांनी ‘वर’ गेल्यावर या भोंदू बाबाच्या माध्यमातून जगासमोर आणले आहे, असे त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकरणाला आणि घडलेल्या घटनांना पूर्णपणे रुपाली चाकणकर मॅडम याच जबाबदार आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजीनामा देताना सुनेत्रा वहिनींसोबत हसतानाचा जो फोटो आला, त्यावरून ठोंबरे यांनी टीका केली की, “एक बाई म्हणून तुला जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती.” चाकणकर यांनी राजीनाम्यासाठी दिलेले ‘वैयक्तिक कारण’ हे खोटे असून हा एक बालिशपणा आणि मुजोरीपणा आहे. तुला हवे तर त्या भोंदू बाबाचे पाय तुझ्या नवऱ्याला लाव, आम्हाला काही देणेघेणे नाही, पण महत्त्वाच्या पदावर बसून असा थिल्लरपणा महाराष्ट्र सहन करणार नाही, असंही ठोंबरेंनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावले होते की, “पहिला राजीनामा द्या आणि मगच बोला,” त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले पाहिजेत. चाकणकर दर १५ दिवसांनी नाशिकला त्या भोंदू बाबाकडे जात होत्या. अशा विकृत कृत्ये करणाऱ्या महिलेचा गुरु हा विकृत भोंदू बाबाच आहे. राजीनामा देतानाच या प्रकरणाचा तपास करा असे सांगणे ही निव्वळ ‘नौटंकी’ आहे, कारण या प्रकरणाच्या मुख्य सूत्रधार त्या स्वतःच आहेत. चाकणकर त्या भोंदू बाबाला ‘पप्पा’ किंवा ‘डॅडी’ म्हणायच्या, आता तो ‘शुगर डॅडी’ होता की काय हे मला माहित नाही. एखाद्या बाईने वैयक्तिक आयुष्यात कुठे फिरावे हे तिचे स्वातंत्र्य असले, तरी आमदार किंवा संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अत्यंत जबाबदारीने वागणे गरजेचे असते. चाकणकर यांनीच अनेक लोकप्रतिनिधींना आणि नेत्यांना या भोंदू बाबाकडे नेले आणि त्यांची ओळख वाढवून दिली. दादांच्या घरातून बाहेर पडलेले ‘उतारे’ आणि त्यांचा झालेला अपघात यामागे ही भोंदूगिरी आणि रक्तातली विकृती कारणीभूत आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सुनेत्रा वहिनींनी अशा बाईसोबत न राहण्याचा आणि राजीनामा घेण्याचा जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. कोणत्याही चांगल्या घरातील माणूस आपल्या घरातील महिलांना अशा बाईसोबत कामाला पाठवणार नाही, असंही ठोंबरेंनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.