मतदारसंघातील कामाचा दाखला, दिलेल्या आश्वासनाची आठवण; शिंदेसेनेच्या रामेश्वर पवळांची विधान परिषद
Shivsena अकोला : विधान परिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणूकीत 9 जागांपैकी दोन जागा शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला जाणार आहेत. यासाठी पक्षात इच्छुकांची मोठी रांग पाहायला मिळत आहे. अकोल्यातील (Akola) शिंदे यांच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्य समन्वयक रामेश्वर पवळ (Rameshwar Pawar) यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पत्रात त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचा सविस्तर आढावा मांडला आहे. पवळ यांनी राज्य समन्वयक म्हणून काम करताना विदर्भ आणि मराठवाड्यात हजारो कार्यकर्ते शिवसेनेत जोडल्याचा दावा केला.
तसेच, बुलडाणा लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षाने दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडल्याचेही त्यांनी नमूद केले. विधानसभेवेळी बाळापूरातून उमेदवारी न मिळाल्याची खंत व्यक्त करतानाच आता पक्षाने न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. ओबीसी आणि वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व म्हणून संधी दिल्यास सकारात्मक संदेश जाईल, असेही पवळ यांनी पत्रात म्हटले आहे. दरम्यान, शिवसेनेत कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि संधी यांचा समतोल साधण्याचे आव्हान नेतृत्वासमोर असल्याचे या निमित्ताने पुन्हा स्पष्ट झाले आहे.
Buldhana: बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील भूमिकेचा उल्लेख
पवळ यांनी बुलडाणा लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचाही विशेष उल्लेख केला आहे. कठीण परिस्थितीत पक्षाने दिलेली जबाबदारी आपण प्रभावीपणे पार पाडली, असे त्यांनी सांगितले. तसेच, या काळात डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म रणनीती आखून ती यशस्वीपणे राबवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
बाळापूर मतदारसंघ: बाळापूर मतदारसंघातील उमेदवारीवरून नाराजी
विधानसभा निवडणुकीदरम्यान बाळापूर मतदारसंघातून लढण्याची तयारी करूनही ऐनवेळी बाहेरून आलेल्या उमेदवाराला पक्षाने संधी दिल्याची खंत पवळ यांनी व्यक्त केली आहे. त्यावेळी संयम ठेवण्याचा सल्ला देत भविष्यात विधानपरिषद किंवा राज्यस्तरीय महामंडळावर संधी दिली जाईल, असे आश्वासन पक्ष नेतृत्वाकडून मिळाल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
Rameshwar Pawar on Shivsena: ‘आश्वासनाची पूर्तता करा’ – रामेश्वर पवळ
दरम्यान या संदर्भात शिवसेनेचे राज्य समन्वयक रामेश्वर पवळ यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना पक्ष यावेळी न्याय करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “मी एक निष्ठावान शिवसैनिक म्हणून पक्षासाठी निस्वार्थपणे काम केले आहे. नेतृत्वाकडून योग्य न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे,” असे पवळ यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, वंजारी समाजातून येणाऱ्या ओबीसी घटकाला संधी दिल्यास राज्यभर सकारात्मक संदेश जाईल, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Rameshwar Pawar: कोण आहेत रामेश्वर पवळ
-एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे राज्य समन्वयक.
-1990 पासून राजकारणात. अकोलावाशीम आणि बुलढाणा हे तिन्ही जिल्हे राजकीय कार्यक्षेत्र.
-याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश संघटन सचिव आणि प्रदेश सरचिटणीस म्हणून काम केलंय.
-राष्ट्रवादीत असताना शरद पवार यांचे निकट असतो म्हणून ओळख.
-राष्ट्रवादीत असतांना राज्यातील अनेक मोठ्या नेत्यांना आणलं पक्षात.
Akola News : पक्ष नेतृत्वाचा निर्णय काय?
रामेश्वर पवळ यांच्या या मागणीमुळे शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या अपेक्षा आणि संधी यांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आता या मागणीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्ष नेतृत्व काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा
Comments are closed.