अमरनाथ यात्रा एका पायावर
आपला देश धार्मिकांचा आणि भाविकांचा आहे. आपल्या धर्मभावना जपण्यासाठी आणि ईशभक्तीचा जागर करण्यासाठी भाविक अत्याधिक कष्ट सहन करुनही अवघड अशा तीर्थ यात्रा पूर्ण करतात. अमरनाथ यात्रा ही अशाच यात्रांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी हिमालयातील अमरनाथ मंदिरात भगवान शिवशंकराच्या हिमलिंगाचे दर्शन करण्यासाठी हजारो श्रद्धाळू देशभरातून येथे येत असतात. ही यात्रा पायी करणे अत्यंत कष्टप्रद आहे. ज्याची प्रकृती ठणठणीत आहे, अशा भाविकांसाठीही ही यात्रा पूर्ण करणे हे एक आव्हान असते. अशा स्थितीत एका महिलेने, तिला एकही पाय नसताना आणि दोन्ही कृत्रिम पायांवर ही यात्रा पूर्ण करुन आपल्या देवभक्तीचा आणि निर्धाराचा परिचय करुन दिला आहे. नेहा भट्ट असे या महिलेचे नाव आहे. यावर्षी होत असलेल्या अमरनाथ यात्रेत नेहा भट्ट यांच्या या दुर्दम्य निर्धाराचीच चर्चा होत आहे. सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे. अमरनाथचा हा देव ‘बाबा बर्फानी’ या नावाने परिचित आहे. नेहा भट्ट यांनी आपल्या कृत्रिम पायांच्या आधारे ही यात्र पूर्ण केली असून त्यांचा व्हिडीओही सध्या प्रसिद्ध होत आहे. दोन्ही नैसर्गिक पाय नसताना त्यांनी कुबड्यांच्या आधारे ही यात्रा केली. आपल्या शारिरीक व्याधीवर मात करुन त्यांनी आपल्या अतुलनीय इच्छाशक्तीच्या आधारे ‘बाबा बर्फानी’ यांचे दर्शन घेतले. अमरनाथचा मार्ग अत्यंत खडतर मानला जातो. गुहेतील मंदिरापर्यंत पोहचण्यासाठी अनेक पर्वत चढावे आणि उतरावे लागतात. प्रत्येक पाऊल जपून आणि लक्षपूर्वक टाकावे लागते. एखादी चूक झाली, तरी काय होईल हे सांगता येणार नसते. अशा स्थितीत स्वत: ‘दिव्यांगत्वा’चा कोणताही ताण स्वत:वर येऊ न देता त्यांनी ही यात्रा पूर्ण करत आपल्या जाज्वल्य शिवभक्तीचा प्रत्यय आणून दिला आहे. सोशल मिडियावरही त्यांच्या या यात्रेचे कौतुक होत असून त्यांचे हे साहस आणि निष्ठा सर्वांनी अंगी बाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली आहे.
Comments are closed.