‘पैठणी पॅटर्न’ने गाजलेल्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात निवडणुकीचे पडघम; दिग्गजांमध्ये लढत
अकोला : राज्यात 2026 मध्ये शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच मतदारसंघात निवडणूक होणार आहे. यामध्ये अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघाचा (Graduate Constituency Election 2025) समावेश आहे. यासोबतच पुणे, कोकण आणि छत्रपती संभाजी नगर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक 2026 मध्ये होणार आहे. 2026 मधील डिसेंबर महिन्यात होणाऱ्या या निवडणुकीच्या निवडणूक प्रक्रियेला आता सुरुवात झाली आहे. सध्या अमरावती आणि पुणे विभाग शिक्षक मतदार संघातील मतदार नोंदणीचा कार्यक्रम महाराष्ट्र निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.
हा कार्यक्रम जाहीर झाल्याबरोबर अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात निवडणुकीचे (Amravati Division Graduate Constituency Election 2025) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. निवडणूक जरी वर्षभरावर असली तरी काही संभाव्य उमेदवारांनी आत्ताच झंजावाती प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्याच्या परिस्थितीत विद्यमान आमदार किरण सरनाईक, मागच्या वेळचे पराभूत उमेदवार आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे आणि माजी राज्यमंत्री प्रहार के बच्चू कडू यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. यातील शिक्षक आघाडीचे नेते आणि माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी गेल्या आठवड्यावरपासून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटींना सुरुवात करून प्रचाराचा धुरळा उडवला आहे. 2020 मध्ये झालेल्या निवडणुकीत अटीतटीच्या सामन्यात अपक्ष किरण सरनाईक यांनी शिक्षक आघाडीचे प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा काठावर पराभव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत सर्व संभाव्य उमेदवार वर्षभराआधीच प्रचाराच्या रणधुमाळी स्वतःला झोकून देतांना दिसत आहेत.
मागच्या 35 वर्षांतील अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार :
कार्यकाळ शिक्षक /आमदार
1990-96 वसंतराव मालधुरे
1996-2002 दिवाक्राव पांडे
2002-2008 वसंतराव खोटरे
2008-2014 वसंतराव खोटरे
2014-2020 प्रा. श्रीकांत देशपांडे
2020-2026 किरणराव सरनाईक
2020 मधील निकालाने सर्वच उमेदवार सावध
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक यंदा चांगलीच चुरशीची होणार आहे. पैठणी देऊन मते मिळवल्याच्या आरोपांमुळे डिसेंबर 2020 मध्ये झालेली निवडणूक गाजली होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे निवडून आले होते. आता शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गज भवितव्य आजमावण्यासाठी मतदार नोंदणीच्या धावपळीला लागले आहेत.
निवडणुकीत भाजप, शिवसेना या प्रमुख पक्षांना धूळ चारून किरण सरनाईक यांनी आश्चर्यकारक विजय मिळवला होता. माजी मुख्यमंत्री, मंत्री, बड्या नेत्यांनी आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पाचही जिल्हे पिंजून काढले होते. सभा बैठका घेतल्या होत्या, पण सर्वांवर मात करून किरण सरनाईक हे विजयी झाले. किरण सरनाईक हे वाशीम जिल्ह्यातील शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्षही होते. संस्थाचालक मंडळाचे विभागीय अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम सांभाळले आहे. प्रसार माध्यमांपासून दूर राहून काम करण्याची त्यांची शैली ही चर्चेत असते. आता त्यांच्या विरोधात राजकीय पक्ष कोणती व्यूहनीती ठरवणार, याची चर्चा रंगली आहे
मतदारसंघात सुमारे 40 हजार मतदारांची नोंदणी होईल, असा अंदाज आहे. या निवडणुकीत पुर्वी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, शिक्षक भारती अशा शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी सर्वसाधारणपणे रिंगणात राहत असत. त्यांना राजकीय पक्ष पाठिंबा देत असत. पण आता थेट राजकीय पक्षांनीच या निवडणुकांमध्ये उडी घेतली आहे.
निवडणुकीत भाजपतर्फे नितीन धांडे, शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे, अपक्ष संगीता शिंदे, शिक्षक आघाडीचे शेखर भोयर यांच्यासह एकूण 27 उमेदवार रिंगणात होते. फारसे चर्चेत नसलेल्या किरण सरनाईक यांनी बाजी मारली. त्यांनी 15 हजार 606 मते मिळवून विजय मिळवला होता. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे प्रा. श्रीकांत देशपांडे यांना 9 हजार 191 मते मिळाली होती. शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिला होता. संगीता शिंदे या भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या भगिनी आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून भवितव्य आजमावले होती.
2020 मधील अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीवर एक दृष्टीक्षेप
1. विजयी उमेदवार: अॅड. किरण रामराव सरनाईक (अपक्ष) — एकूण 15,606 मतांनी विजयी ठरले.
2. पराभूत मुख्य उमेदवार: प्रा. श्रीकांत देशपांडे 3,242 मतांनी पराभूत.
3. एकूण झालेलं मतदान : 30,918 मतं
4. अवैध/रद्द मतं: 1,089 मतं रद्द घोषित झाली. (त्यामुळे वैध मतांची एकूण संख्या ≈ 30,918 − 1,089 = 29,829).
5. मतदान टक्केवारी / टर्नआऊट: नोंदणीकृत सुमारे 35,622 शिक्षक मतदारांपैकी 30,918 ने मतदान केल्याने टर्नआऊट ≈ 86.73% झाली — ही मागील 2014 मधील निवडणुकीच्या 66% पेक्षा मोठी वाढ आहे.
6. प्राथमिक (first-preference) मुद्दे: पहिल्या-आवड (first-preference) मोजणीत किरण सरनाईकांना 6,095 पहिले मत मिळाले आणि श्रीकांत देशपांडे यांना 5,135 पहिले मत. (नंतर पसंतीचे व्होट ट्रान्सफर/कॉउंटिंग प्रक्रियेनंतर अंतिम निकाल आला).
2020 ची निवडणूक घातली होती पैठणीच्या वाटपाने
2020 च्या निवडणुकीत प्रमुख लढत ही तेव्हाचे विद्यमान आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे, भाजपाचे प्रा. नितीन धांडे आणि प्रहारचे शेखर भोयर यांच्यात लढत समजली जात होती. या निवडणुकीत अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना कुणीच लढतीत मानत नव्हते. मात्र, किरण सरनाईक यांनी मिळवलेल्या अनपेक्षित यशाने आणि विजयने सर्वजण अचंब्यात पडले होते. मात्र, या निवडणुकीत विजयी उमेदवार किरण सरनाईक यांनी ‘पैठणी पॅटर्न’ राबविल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. निवडणुकीत उमेदवार असलेल्या किरण सरनाईक यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षकांना पैठणी, बॅग आणि पैशांं वाटप केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या आरोपांनी ही निवडणूक प्रचंड गाजली होती. याही निवडणुकीत हा पॅटर्न वापरला जातो का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातील ही निवडणूक ही प्रचंड ‘हाय व्होल्टेज’ असेलच यासोबतच ती प्रचंड खर्चिकही असेल, अशी शक्यता जी आहे ती राजकीय जाणकार व्यक्त करतात.
अनेक दिग्गजांच्या भाऊगर्दीत मतदारसंघात होणार ‘हाय व्होल्टेज’ लढत
या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवार आपले नशीब आजमावण्याची शक्यता आहे. सध्याचे आमदार किरण सरनाईक, माजी आमदार श्रीकांत देशपांडे हे उमेदवार असतील हे स्पष्ट झाला आहे. यासोबतच प्रहारचे अध्यक्ष आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही अमरावती शिक्षक मतदार संघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीने मतदारसंघात मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे यासोबतच भाजपकडून माजी राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे, प्रा. दिनेश सूर्यवंशी, प्रा. नितीन धांडे अशा अनेकांचा इच्छुकांमध्ये समावेश आहे. यासोबतच ऐनवेळी काही दिग्गज अपक्ष म्हणून या मतदारसंघात उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमरावती विभाग शिक्षक मतदार संघातील लढत ही अत्यंत हाय व्होल्टेज असेल आणि या लढतीत निकालही आश्चर्यकारक येण्याची शक्यता आहे.
असा असेल मतदार नोंदणी कार्यक्रम
निवडणूक आयोगाने अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विभागीय आयुक्त श्वेता सिंघल आणि पाच जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना हा कार्यक्रम पाठवण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त 25 नोव्हेंबरला प्रारूप मतदार यादी प्रकाशित करतील. 12 डिसेंबरपर्यंत हरकती आणि सूचना स्वीकारल्या जातील. 25 डिसेंबरपर्यंत सुनावणी होईल. 30 डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होईल.
30 सप्टेंबरपासून निवडणुकीची अधिसूचना जारी होईल. त्याच दिवशी मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू होईल. मतदार नोंदणीसाठी 1 नोव्हेंबर 2025 ही पात्रता तारीख निश्चित करण्यात आली आहे.
15 ऑक्टोबरला दुसरी अधिसूचना जारी होईल. 25 ऑक्टोबरला तिसरी अधिसूचना नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केली जाईल. मतदार नोंदणी 6 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. 20 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप मतदार यादी तयार होईल.
निवडणुकीत मतदार नोंदणीसाठी यावेळी पहिल्यांदाच नवे नियम लागू करण्यात आलेयेत. गठ्ठा पद्धतीने राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून होणारी मतदार नोंदणी यावेळी थांबविण्यात आलीये प्रत्येक मतदाराला स्वत:च स्वत:ची नोंदणी आयोगाकडे करावी लागणारेय.
2020 मधील निवडणुकीत मत चोरी झाल्याचा प्रा. श्रीकांत देशपांडे यांचा आरोप :
सध्या देशात गाजत असलेला ‘व्होट चोरी’चा मुद्दा अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतही गाजण्याची चिन्ह आहेत. 2020 मध्ये झालेल्या ‘व्होट चोरी’मूळेच आपला पराभव झाल्याचा गंभीर आरोप माजी आमदार आणि या निवडणुकीतील उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केला. ते अकोला येथे ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
राज्यात डिसेंबर 2026 मध्ये होणार असलेल्या अमरावती आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली. यासोबतच अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजायला लगेच सुरूवात झाली. या मतदारसंघात लगेच प्रचाराची रणधुमाळी सुरूही झाली आहे. माजी आमदार आणि मागच्या वेळी थोडक्यात पराभूत झालेले उमेदवार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी अकोल्यातून प्रचाराला सुरूवात केलीये. या प्रचारात मागील निवडणुकीत अपात्र लोकांच्या नोंदणीमूळे आपल्यासंदर्भात 2020 मध्ये ‘वोट चोरी’ झाल्याचा आरोप ते प्रचारातून करत आहेत.
Comments are closed.