महाराष्ट्रात ना कायदा, ना सुव्यवस्था; अंधेरीत अंमली पदार्थांचा कारखाना उद्ध्वस्त, छोटय़ा खोलीतून महिन्याला 30 कोटींच्या एमडी ड्रग्जची विक्री
राज्यात मागील काही महिन्यांपासून ड्रग्ज तस्करीचे गंभीर गुन्हे उघडकीस येऊ लागले आहेत. नेस्कोमध्ये एका पार्टीत अमली पदार्थांच्या सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यापाठोपाठ मुंबईत अंधेरी येथे एका चाळीत ड्रग्ज निर्मितीचा कारखाना चालत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भोंदूबाबा खरात प्रकरणामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यातच अमरावतीत सेक्स स्पॅण्डलचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली असून महायुती सरकारच्या काळात राज्यात कायदा व सुव्यस्थेचा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
अंधेरीतील सहार रोडवरील भास्कर चाळीत 13 हजार रुपये भाडय़ाच्या एका छोटय़ा खोलीत चालणारा एमडी बनवण्याचा कारखाना पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या फॅक्टरीतून दरमहा 25 ते 30 कोटी रुपयांचे ड्रग्ज तयार करून त्यांची विक्री केली जात होती. या प्रकरणात पोलिसांनी ड्रग्ज तस्कर मोहम्मद आरिफ मोहम्मद इलियास शेख (44) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार रिजवान अहमद लियाकत अली याला उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथून अटक करण्यात आली आहे.
खार पोलिसांनी गस्त घालत असताना मोहम्मद आरिफ या संशयास्पद व्यक्तीला अटक केली. त्याच्याकडून 15.44 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि मोबाईल जप्त करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या अंधेरीतील भाडय़ाच्या खोलीवर छापा टाकला असता आरिफ याने याच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात एमडी ड्रग्ज तयार करण्याची यंत्रणा उभी केल्याचे उघकीस आले. त्या ठिकाणी ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारी रसायने आणि उपकरणे आढळून आली. मुंबईत मागील तीन वर्षांपासून तो ड्रग्ज कारखाना चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
आरिफची पत्नी नसरीन ड्रग्ज विक्रीच्या पैशांचा व्यवहार सांभाळायची. तिच्या बँक खात्यात 26 लाख रुपये जमा असल्याची माहिती पोलीस तपासत समोर आली. पोलिसांनी ते खाते गोठवले आहे. पोलिसांकडून त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे.
गुजरातमधील फरार गुन्हेगार मुंबईत सक्रिय
मोहम्मद आरिफ हा गुजरात पोलिसांच्या ताब्यातून 2023 मध्ये पॅरोलवर बाहेर आला आणि लगेच फरार झाला. त्याने मुंबईत सांताक्रूज पूर्वेतील गोळीबार नगर येथे पत्नीसोबत राहताना अंधेरीत वेगळी खोली घेऊन तिथे ड्रग्ज निर्मितीचा कारखाना सुरू केला होता. त्याच्यावर आधीच 15 हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
नेस्को ड्रग्ज प्रकरणी 5 जणांना अटक
गोरेगावमधील नेस्को सेंटरमध्ये झालेल्या पार्टीत ड्रगच्या ओव्हरडोसने एमबीएच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी वनराई पोलिसानी सहा जणांना अटक केली. रौनक खंडेलवाल, आकाश सामल, सनी जैन, बाळकृष्णन कुरूप, प्रतीक पांडे आणि आनंद पटेल अशी त्या सहा जणांची नावे आहेत. त्या सहा जणांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विहान ऊर्फ आकाश समळ याने केले होते, तर आनंद पटेल हा मुख्य पुरवठादार होता, असे समजते.
Comments are closed.