एपीएमसी मार्केटवर एफडीएची छापेमारी व्यापाऱ्यांना दणका, आंबे पिकवण्यासाठी घातक लिक्विड स्प्रेचा वापर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आंबे पिकवण्यासाठी विक्रेते घातक लिक्विड स्प्रेचा वापर करीत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी एपीएमसीच्या फळ मार्केटमध्ये छापेमारी केली. अनेक व्यापाऱ्यांच्या गाळ्यांवर जाऊन आंब्यांची तपासणी करून संशयास्पद आंबे तपासणीसाठी ताब्यात घेतले. या छापेमारीमुळे व्यापाऱ्यांची एकच पळापळ उडाली. दरम्यान, पाथर्डी येथे कलिंगड खाल्ल्यामुळे एका कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्यानंतर फळे पिकवण्यासाठी घातक रसायनांचा वापर करणाऱ्या व्यापाऱ्यांवर एफडीएने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

एपीएमसी मार्केटच्या ओपन शेडमध्ये व्यापार करणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या गाळ्यावर आंबे पिकवण्यासाठी घातक रसायनांची फवारणी केली जात असल्याचा व्हिडिओ गेल्या दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकारावर अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. त्याची गंभीर दखल घेऊन एफडीएच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी फळ मार्केटमध्ये छापेमारी केली. विविध गाळ्यांवर जाऊन त्यांनी संशयास्पद आंबे ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आंब्यांवर घातक रसायनांची फवारणी केल्याचे उघडकीस आले तर संबंधित व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, ग्राहकांनी विश्वासार्ह विक्रेत्यांकडून फळांची खरेदी करावी. जर आंबे कृत्रिमरित्या पिकवलेले दिसले तर तातडीने एफडीएला कळवावे, असे आवाहनही अधिकाऱ्यांनी केले.

पावडरला परवानगी, लिक्विडला बंदी
आंबे पिकवण्यासाठी इथोफोन या पावडरचा वापर करण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे. मात्र काही व्यापारी हेच औषध पावडरऐवजी लिक्विड स्वरूपात वापरतात. इथोफोनच्या लिक्विड वापराला बंदी घालण्यात आली आहे. हे औषध लिक्विडमध्ये वापरल्यास त्याचा संपर्क थेट फळाशी येतो. पावडरचा वापर केल्यानंतर त्याचा संबंध फळाशी येत नाही. पावडरची पुडी तयार करून बॉक्समध्ये ठेवली असता इथिलीन वायू तयार होतो आणि आंबे पिकतात, अशी माहिती एपीएमसीचे संचालक संजय पानसरे यांनी व्यक्त केली आहे.

Comments are closed.