औरंगजेबाच्या कबरीवर थुंकण्याची व्यवस्था करावी; भाजपच्या बड्या नेत्याची फडणवीस सरकारकडे मागणी
नवी दिल्ली : छत्रपती संभाजी महाराजांना हाल हाल करुन ठार मारणाऱ्या क्रूरकर्मा औरंगजेबाला देखील याच महाराष्ट्रात गाडण्यात आलंय. संभाजी महाराजानंतर रामराम महाराज, महाराणी ताराबाई आणि मराठा योद्ध्यांनी औरंगजेबाला इथंच ठार मारलं. त्यानंतर, औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगर येथे बांधण्यात आली आहे. आता, या कबरीवरुन जोरदार वाद सुरू झाला आहे. औरंगजेबाच्या (Aurangzeb) कबरीची जबाबदारी पुरातत्व विभागाला देण्यात आली असून त्यांच्याकडून ही जतन करण्यात येत आहे. मात्र, ही कबर हटविण्याची मागणी जोर धरत आहे. मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून औरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी केली जात आहे. संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर हटवली नाही तर विश्व हिंदू परिषद कारसेवा करत स्वतः कबर हटवेल, असा इशाही सरकारला देण्यात आला आहे. त्यातच, आता भाजप नेते सुनिल देवधर यांनी या कबरीला हटविण्यात येत नसेल तर तिथे थुंकण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केलीय.
महाराष्ट्रात देवाभाऊंचं कायद्याचं राज्य आहे, जे काही होईल ते कायद्यानेच होईल. औरंगजेबाच्या कबरीला उखडून टाकावे अशीच माझी देखील भूमिका आहे. मात्र, जर या कबरीला हटविण्यात येत नसेल तर औरंग्याच्या थडग्यावर थुंकण्याची व्यवस्था करा, अशी मागणी सुनिल देवधर यांनी एबीपी माझाशी बोलताना केली. तसेच, संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीवर तशी व्यवस्था करण्यात यावी, तसे झाल्यास तिथलं पर्यटन वाढेल, असेही देवधर यांनी म्हटले. औरंगजेबाची कबर उखडलीच पाहिजे, पण ते कायद्याने होत नसेल तर हा पर्याय असल्याचंही त्यांनी म्हटलं. दरम्यान, सुनिल देवधर हे भाजपचे राष्ट्रीय सचिव होते, ते सध्या आंध्र प्रदेश भाजपचे सहप्रभारी आहेत. तर, त्रिपुरामधील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती.
कबरीसंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
इथे महिमामंडन होईल तर फक्त शिवरायांचे होईल, औरंगजेबाच्या कबरीचे होणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. तसेच, औरंगजेबाच्या कबरीला एएसआयने 50 वर्षापूर्वी संरक्षण दिले आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारला देखील तिथे संरक्षण देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमा मंडन कधीच होणार नाही. एक वचन तुम्हाला देतो, काहीही झालं तरी या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीचे महिमामंडन होऊ देणार नाही, उदात्तीकरण होऊ देणार नाही, तसा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न चिरडून टाकू, हे वचन छत्रपती शिवरायांच्या मंदिरासमोर देतो, असे मुख्यमंत्र्यांनी भिवंडीतील कार्यक्रमातून ठणकावून सांगितले आहे.
हेही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.