आठ महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांना कशी फायद्याची? बच्चू कडू यांनी उदाहरणासह सांगितलं
नागपूर : राज्यात अतिवृष्टी झाल्यानंतर शेतकऱ्यांना (Farmers) कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरु लागली. विरोधातील सर्वच राजकीय पक्षांनी ही मागणी केली होती, तसेच अतिवृष्टीची भरगोस मदतही शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी होती. त्यातच, प्रहार संघटनेचे प्रमुख तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी प्रश्नावरुन सरकारविरुद्ध एल्गार पुकारला. महाएल्गार आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी सरकारला आपलं म्हणणं मान्य करण्यास भाग पाडलं. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत जून 2026 मध्ये कर्जमाफी करणार असल्याचं सरकारने मान्य केलं असून उच्चस्तरीय समिती देखील नेमण्यात येणार आहे. मात्र, 8 महिन्यानंतर कर्जमाफी का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. त्यावर, 8 महिन्यानंतरची कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी कशी फायदेशीर आहे, हे बच्चू कडू यांनी उदाहरणासह स्पष्ट केलं आहे.
राज्यातील शेतकऱ्यांकडून आजच कर्जमाफीची घोषणा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. मात्र, आज होणाऱ्या कर्जमाफीच्या तुलनेत आठ महिन्यानंतर होणारी कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी जास्त फायद्याची राहील असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. जर सरकारने कालपासूनच कर्जमाफी दिली असती, तर 31 मार्च 2025 पर्यंतचे शेतकऱ्यांचे थकीत कर्ज त्यात बसले असते. मात्र, आता 31 मार्च 2026 पर्यंत चे थकीत कर्ज त्यामध्ये बसतील. त्यामुळे, यंदाच्या अत्यंत जास्त अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा या कर्जमाफीमुळे जास्त फायदा होईल आणि हेच त्या कर्जमाफीचे जास्त उल्लेखनीय यश असल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
कर्जमाफीचे श्रेय सरकारलाच मिळणार
सरकारच्या प्रतिनिधींसोबत काल अडीच तास जोरदार खडाजंगी झाली. सरकार आर्थिक कारण सांगून शेवटपर्यंत तारीख द्यायला तयार नव्हते. मात्र, आम्ही तारीख घेऊनच आलो, असा दावाही बच्चू कडू यांनी कालच्या बैठकी संदर्भात बोलताना केला. सर्वांची नाही मात्र गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी निश्चित होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 30 जून 2026 पर्यंत होणाऱ्या या कर्जमाफी संदर्भात सरकारमधील तिघांना आम्ही श्रेय देतो. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी शब्द दिला होता. आता अजित पवार आणि आमचे देवा भाऊ यांनी मोठी मेहनत घेतली आहे. हा श्रेयाचा प्रश्नच नाही, हा राजकीय आशीर्वादाचा मुद्दा आहे. कर्जमाफी झाल्यानंतर श्रेय तर अखेरीस सरकारलाच मिळणार असल्याचे ही बच्चू कडू म्हणाले.
तर आमच्या हातातील हिरवा रंग लाल होईल
दरम्यान, सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी या कर्जमाफीचा फायदा करून घेईल अशा विरोधकांच्या आरोपाबद्दलही बच्चू कडू यांनी बोलकी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही नामर्दाची अवलाद नाही, जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये फायदा करून घेऊन सरकारने कर्जमाफी केली नाही. तर आमच्या हातातला हा हिरवा रंग लाल होऊन जाईल, आम्ही सरकारला सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला..
कर्जमाफीच्या घोषणेनंतर बच्चू कडूंना आईची आठवण
कर्जमाफीची तारीख जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी आपल्या दिवंगत आईची आठवण केली. आज माझी आई राहिली असती, तर तिचा समाधानी चेहरा पाहण्याचा आनंद मला भेटला असता. यंदा निवडणुकीचा गुलाल आमच्या हातून गेला असेल. मात्र, आमच्या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचं आयुष्य रंगीत करण्याचा मोका आम्हाला मिळाला आहे. आज आई असती तर तिला हे पाहून आनंद झाला असता. आज जिथे कुठे ती असेल, ती हे पाहून आनंदित होत असेल अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी बच्चू कडू यांनी दिली.
हेही वाचा
आणखी वाचा
 
			 
											
Comments are closed.