बांगलादेशसमोर पाकिस्तानचा दोन्ही कसोटीत पराभव, इकडे टीम इंडियाला मोठा धक्का, काय घडलं?

नवी दिल्ली : बांगलादेशनं पाकिस्तानला कसोटी मालिकेत 2-0 असा व्हाइट वॉश दिला. बांगलादेशच्या या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत भारताची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. विशेष बाब म्हणजे बांगलादेशनं भारताला मागं टाकत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे.

पाकिस्तानला बांगलादेशवर विजय मिळवण्यासाठी 437 धावा करायच्या होत्या. मात्र, पाकिस्तानचा संघ 358 धावांवर बाद झाला.पाकिस्तान डब्ल्यूटीसी रँकिंगध्ये आठव्या स्थानावर आहे.

बांगलादेशचा विजय, भारताला धक्का

बांगलादेशनं पाकिस्तानला दुसऱ्या कसोटीत 78 धावांनी पराभूत केलं. बांगलादेशनं मीरपूर येथे झालेला पहिला कसोटी सामना 104 धावांनी जिंकला होता. बांगलादेशच्या आजच्या विजयानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. बांगलादेशनं भारताला मागं टाकत पाचवं स्थान मिळवलं आहे. तर, भारत सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.

बांगलादेशनं चार कसोटी सामन्यांमध्ये दोन विजय, एक पराभव आणि एक अनिर्णीत सामन्यासह 58.33 गुण मिळवले आहेत. दुसरीकडे भारतानं नऊ कसोटी सामने खेळले आहेत, यामध्ये भारताचे चार पराभव आणि चार विजय झालेत. याशिवाय भारताचा एक सामना अनिर्णीत राहिला आहे. भारताच्या गुणांची संख्या 48.15 इतकी आहे.

भारतानं पहिल्या दोन जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यावेळी मात्र भारत आशियाई देशांचा विचार केला असता पाकिस्तानच्या वर आहे. शुभमन गिलच्या नेतृत्त्वात भारतानं 2026 मध्ये एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 6 जूनपासून एक कसोटी सामना सुरु होईल. मात्र, तो जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग नाही.

भारत या वर्षाच्या अखेरीस श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यांमध्ये टीम इंडिया प्रत्येकी दोन असे मिळून 4 सामने खेळेल. यानंतर पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका होणार आहे. ही मालिका भारतात होईल.

भारताला मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता. दक्षिण आफ्रिकेनं भारतावर दोन्ही सामन्यात विजय मिळवला होता. तर, इंग्लंडमधील पाच कसोटी सामन्यांची मालिका भारतानं 2-2 अशी बरोबरीत सोडवली होती.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत रँकिंग गुणांऐवजी टक्केवारीवर निश्चित केलं जातं. 2025-2027 या सायकलमध्ये बांगलादेशच्या नावावर 28 तर भारताच्या नावावर 52 गुण आहेत.

दरम्यान, ऑस्ट्रेलियानं आठपैकी 7 सामन्यात विजय मिळवत  आणि एका पराभवासह 87.50 टक्के अंक मिळवला आहेत. ऑस्ट्रेलिया गुणतलाकिते पहिल्या स्थानावर आहे. तर, न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर असून त्यांची टक्केवारी 77.78 इतकी आहे. यानंतर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या आणि श्रीलंका चौथ्या स्थानी आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.