Gurnoor Brar – 6 फूट 5 इंच उंच वेगवान गोलंदाज, विराटलाही सतवलंय; गुरनूर ब्रार आहे तरी कोण?
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान या संघांमध्ये कसोटी आणि वनडे मालिका खेळली जाणार आहे. 6 जून पासून कसोटी मालिकेतील एकमेक कसोटी सामन्याला सुरुवात होईल. तर 14 जून पासून उभय संघांमध्ये तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये चार तरुण आणि नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये पंजाबच्या 25 वर्षीय वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रार याचा सुद्धा समावेश आहे. गुरनूरचा समावेश टीम इंडियाच्या 15 सदस्यीय संघामध्ये करण्यात आला आणि त्याच्या नावाची चर्चा सुरू झाली.
पंजाबच्या मातीत जन्मलेल्या गुरनूर ब्रारने आपल्या वेगवान गोलंदाजीने निवडकर्त्यांना प्रभावित केलं आणि त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली. विराट कोहलीला सुद्धा त्याने आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवलं आहे. गोलंदाजीसोबत फलंदाजीमध्ये त्याची कामगिरी दमदार राहिली आहे. गुरनूरने 2022 साली पहिल्यांदाच प्रथम श्रेणी क्रिकेट आणि लिस्ट ए मध्ये पदार्पण करत आपला पहिला सामना खेळला. त्याने आपल्या गोलंदाजीची झलक वेळोवेळी दाखवून दिली आहे. त्याने आतापर्यंत 18 प्रथम श्रेणी सामने आणि 9 लिस्ट ए सामने खेळले आहेत. त्याच्या याच चमकदार कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचीही संधी मिळाली. 2023 साली पहिल्यांदाच आयपीएलचा दरवाजा त्याच्यासाठी खुला झाला. अंगद बावाच्या जागी 20 लाख रुपये किंमतीवर पंजाब किंग्जने त्याला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतलं. या हंगामात एक सामना खेळण्याची संधी त्याला मिळाली. त्यानंतर 2025 साली गुजरात टायटन्सने त्याला 1.30 कोटी रुपयांची बोली लावत संघात सामिल करुन घेतलं.
IPL 2026 – मला हे कुणाला सांगायचं नव्हतं, पण… वैभव सूर्यवंशीनं सांगितलं ‘A’ सेलिब्रेशनमागचं गुपित
आयपीएल व्यतिरिक्त देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याची आतापर्यंतची कामगिरी दमदार राहिली आहे. 2024-25 च्या देशांतर्गत हंगामात त्याने आपल्या धारधार गोलंदाजीने पंजाबसाठी धडाकेबाज कामगिरी केली. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने लयबद्ध, शिस्तबद्ध आणि अचूक मारा करत 26 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला होता. 2024-25 च्या हंगामातील पंजाबचा सर्वात यशस्वी गोलंदाज म्हणून त्याने नावलौकिक मिळवला. 2024 साली टीम इंडियाची बांगलादेशविरुद्ध मालिका सुरू असताना नेट्समध्ये विराट कोहलीला त्याने चांगलच कोड्यात पाडलं होतं. ब्रारच्या धारधार गोलंदाजीवर खेळताना विराटलाही त्रास झाल होता. तसेच त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितंल होतं की, तो दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनचा मोठा चाहता आहे. त्याच्यामुळेच त्याने गोलंदाजीला सुरुवात केली, असही तो म्हणाला होता. त्यामुळे आगामी अफगानिस्तानविरुद्ध मालिकेत गुरनूर ब्रारवर क्रीडा प्रेमींच्या नजरा असणार आहेत.
Comments are closed.