VIDEO: वैभव सूर्यवंशीने 'A' सेलिब्रेशन मागचे रहस्य टीव्हीवर लपवले, मात्र ड्रेसिंग रुममध्ये केले उघड
आयपीएल २०२६ मध्ये पुन्हा एकदा १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी ऑरेंज कॅपचा हकदार ठरला आहे. राजस्थान रॉयल्सच्या या युवा फलंदाजाने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध अर्धशतकी खेळी केल्यानंतर ‘A’ अक्षर दाखवून सेलिब्रेशन केले. त्याला सामन्यानंतर यामागचे विशेष कारण काय असे विचारताना त्याचे उत्तर देणे त्याने टाळले, मात्र ड्रेसिंग रुममध्ये त्याने सत्य सांगितले आहे.
आयपीएल २०२६ मध्ये मंगळवारी (१९ मे) जयपूरमध्ये लखनऊ आणि राजस्थान भिडले. या सामन्यात शतक मुकल्याने वैभव निराश दिसला. तत्पूर्वी त्याने अर्धशतक केल्यानंतर आनंद व्यक्त केला. तेव्हा त्याने ‘A’ अक्षराची आकृती काढून जल्लोष केला. त्याने या सामन्यात ९३ धावा केल्या आणि तो सामावीराचा मानकरी ठरला. त्यावेळी त्याला समालोचकाने त्याच्या सेलिब्रेशनबद्दल विचारले, तेव्हा त्याने स्पष्टीकरण देण्यास नकार दिला. तो म्हणाला, “सर, मला माहित नाही. मी प्रत्येक सामन्यात फक्त काहीतरी नवीन करत असतो. मी याचे काही नियोजन करत नाही. यामागे कोणताही अर्थ नाही. अगदी गेल्या सामन्यात मी जे सेलिब्रेशन केले होते, त्यालाही काही अर्थ नव्हता. मी फक्त नवीन गोष्टी करून पाहत असतो.”
ड्रेसिंग रुममध्ये जेव्हा राजस्थानचे व्यवस्थापक रोमी भिंदर यांनी वैभवला सेलिब्रेशनबाबत विचारले असता त्याने लगेच उत्तर दिले. त्याने स्पष्ट केले की, त्याचे ‘A’ सेलिब्रेशन, ज्याबद्दल तो टीव्हीवर अस्पष्ट विधाने करत होता, ते त्याच्या आईसाठी होते. त्याच्या आईचे नाव ‘A’ ने सुरू होते. त्याच्या आईचे नाव आरती सूर्यवंशी आहे.
राजस्थानने शेयर केलेल्या एका व्हिडिओमध्ये वैभव म्हणाला, “मी हे माझ्या आईला समर्पित केले आहे. ही एक वैयक्तिक बाब असल्याने मला ते सर्वांना सांगायचे नव्हते.”
या आयपीएल हंगामात जेव्हा-जेव्हा वैभवची बॅट तळपली आहे, तेव्हा-तेव्हा त्याने नवे विक्रम रचले आहेत. लखनऊ विरुद्ध त्याने ३८ चेंडूंत ७ चौकार आणि १० षटकारांच्या सहाय्याने ९३ धावा केल्या. याबरोबरच तो एका आयपीएल हंगामात ५० षटकारांचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला. तसेच तो एकाच हंगामात सर्वात जलद ५०० पेक्षा अधिक धावा करणारा फलंदाजही ठरला आहे.
Comments are closed.