“वैभव सूर्यवंशी गोलंदाजांच्या मनात क्रिस गेलसारखी दहशत…,” माजी अष्टपैलूचे कौतुकास्पद वक्तव्य

सलग दुसऱ्या आयपीएल हंगामात आपल्या स्फोटक फलंदाजीने वैभव सूर्यवंशीने क्रिकेट रसिकांचे लक्ष वेधले आहे. त्याने अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. मंगळवारी (१९ मे) पुन्हा एकदा त्याची अनुभुती झाली. जयपूरच्या मैदानावर राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना रंगला. यामध्ये या १५ वर्षीय युवा खेळाडूने पुन्हा चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याची ही जबरदस्त खेळी पाहून माजी अष्टपैलूने तो गोलंदाजांच्या मनात क्रिस गेलसारखी भीती निर्माण करतो, असे मत व्यक्त केले आहे.

या सामन्यात वैभवचे शतक हुकले असले तरी त्याने महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला यशस्वीरित्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यास मदत केली. राजस्थानने हा सामना जिंकला असल्याने त्यांच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा वाढल्या आहेत. यामधील वैभवच्या ९३ धावांच्या खेळीचे भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने कौतुक केले. तो म्हणाला, “क्रिस गेल त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये असताना जसा गोलंदाजांच्या मनात दहशत निर्माण करायचा, अगदी तसेच वैभव करत आहे.”

“गोलंदाज म्हणून आम्हाला गेलचा सामना करायला नेहमीच भीती वाटायची. वैभव सूर्यवंशी तीच भीती निर्माण करत आहे. वैभव आता एका हंगामात सर्वाधिक षटकारांच्या (५९) गेलच्या विक्रमाला आव्हान देऊ शकतो, जो २०१२ पासून अबाधित आहे,” असेही पठाणने पुढे म्हटले आहे.

या सामन्यात लखनऊने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ विकेट्स गमावत २२० धावा केल्या. प्रत्युत्तरात राजस्थानने १९.१ षटकांत केवळ ३ विकेट्स गमावत २२५ धावा केल्या. यामध्ये वैभवने पहिल्या विकेटसाठी यशस्वी जायस्वालसोबत ७५ (३९) धावांची भागीदारी केली. त्यानंतर ध्रुव जुरेलसोबत १०५ (४५) धावांची भागीदारी केली. या भागीदाऱ्या करताना त्याने ३८ चेंडूंत ७ चौकार आणि १० षटकार मारले. त्याचबरोबर तो एका आयपीएल हंगामात ५० किंवा ५० पेक्षा अधिक षटकार मारणारा पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आता १३ सामन्यांत ५७९ धावा झाल्या असून तो ऑरेंज कॅपचा मानकरी आहे.

Comments are closed.