खळबळजनक! चक्क न्यायाधीशांच्या घरावर चोरट्यांचा डल्ला; 20 तोळे सोन्यासह रोकड लंपास, बार्शीत खळबळ
सोलापूर गुन्हा सोलापूर: बार्शी तालुक्यातील पाथरी गावात धाडसी चोरीची घटना घडली असून चक्क न्यायाधीश महोदयांच्या घरीच चोरट्याने डल्ला घातला आहे. मध्यरात्री 1.30 वाजताच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजाचं कुलूप तोडून घरातील ज्वारीच्या कोट्यातून जवळपास 20 तोळे सोने आणि 5 हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. न्यायाधीश हे देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले असता ही घटना घडली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीचा शोध सुरू आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, पाथरी येथील दिनेश गायकवाड हे सध्या वाशिम तालुक्यातील रिसोड येथे न्यायदंडाधिकारी असून सुट्टीनिमित्ताने ते गावी आले होते. त्यातच, धार्मिक कार्यक्रमनिमित्ताने ते कोल्हापूरला दर्शनासाठी गेले असता, त्यांच्या घरात चोरीची घटना घडली. याबाबत, त्यांच्या आई पद्मिनी मुकुंद गायकवाड यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याने घरातील सोन्याचे दागिने अंदाजे किंमत 12 लाख 23 हजार रुपये आणि 5 हजार रोकड लंपास केल्याचे नमूद केले आहे.
अचूक डाव साधत चोरट्यांचा डल्ला
दाखल तक्रारीनुसार, आमचे घरी धार्मिक कार्यक्रम असल्याने मुलगा, सुन व नातवंडे घरी पाथरी येथे आले होते. तसेच मुलगी रेश्मा तिच्या मुलांसह कार्यक्रमासाठी आली असून ती सध्या आमच्याकडेच राहण्यास आहे. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर दिनांक 15 मे रोजी रोजी मुलगा, सुन व नातवंडे असे देवदर्शनासाठी कोल्हापूर येथे गेले आहेत. काल दिनांक 16 मे रोजी रात्री 10 वाजता मी आणि मुलगी रेश्मा, नातवंडे असे जेवण वगैरे करून घराच्या हॉलमध्ये झोपलो होतो. हॉल व किचन-बेडरूममध्ये रिकामा पोर्च असल्याने किचनला बाहेरून कुलूप लावून नेहमी झोपतो. काल देखील आम्ही जेवण झाल्यानंतर किचनला बाहेरून कुलूप लावून झोपलो होतो. आज रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास मी झोपेतून उठून हॉलचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता बाहेरून कडी लावल्याचे दिसून आले. त्यामुळे मी खिडकीतून बाहेर पाहिले असता किचन रुमचे कुलूप लावलेले नव्हते व दरवाजा उघडा दिसला.
12 लाख 23 हजार रुपयांचे दागिने अन् रोख लंपास
त्यामुळे मी माझी जाऊ-कमल केशव गायकवाड यांना फोन करून हॉलची बाहेरून लावलेली कडी काढण्यास सांगितली. त्यांनी येवून कडी उघडली असता आम्ही बाहेर येवून पाहिले असता किचन रुमचे कुलूप लावलेले दिसून आले नाही. दरवाजा उघडा असल्याने आम्ही किचन व बेडरुममध्ये जाऊन पाहिले असता बेडरुममधील फर्निचर कपाटातील कपडे व इतर साहित्य बाहेर काढून विस्कटून टाकलेले दिसून आले. तसेच धान्याचे कोठयाचे टोपणे काढून धान्य विस्कटलेले होते. माझी पर्स उचकटलेली होती. त्यामध्ये मी ठेवलेले पाच हजार रुपये व गळ्यातील मण्याची पोत दिसून आली नाही.
यावरून घरात चोरी झाली असल्याचे खात्री झाल्याने मी मुलगा व सुन यांना फोन करून सदरचा प्रकार सांगितला असता सुन-अपेक्षा हिने सांगितले की, ‘मी रिसोड येथून येताना माझे व मुलांचे दागिने व दिनेश यांच्या अंगठ्या घेवून गावी आले होते. मी देवदर्शनाला येताना सदरचे दागिने एका डब्यात भरून तो डब्बा ज्वारीच्या कोटीमध्ये ठेवला होता, तो आहे का बघा’. असे सांगितले. त्यानंतर आम्ही दोन्ही कोट्याची तपासणी केली असता दागिन्याचा डब्बा दिसून आला नाही. यावरून सदरचे दागिने चोरीस गेले असल्याची खात्री झाल्याने मी सुनेला माहिती दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.