संतापजनक! बीडमध्ये 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार, आईवर ग्रामस्थांचा दबाव; अखेर गुन्हा दाखल
बीड : मालेगावच्या (nashik) डोंगराळे येथील घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून सर्वत्र संतापाची भावना आहे. 3 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्दयीपणे हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आता बीडमध्ये (Beed) एका साडेपाच वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाला आहे. विशेष म्हणजे नात्यातीलच मुलाने अत्याचार केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर, धक्कादायक बाब म्हणजे गावातील लोकांनी गुन्हा दाखल न होण्यासाठी मुलीच्या आईवर दबाव आणल्याचे देखील प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
पीडित मुलीवर बीडच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 11 नोव्हेंबर रोजी ही अत्याचाराची घटना घडल्यानंतर तब्बल चार दिवस मुलीला उपचारासाठी गावकऱ्यांनी जाऊ न दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ग्रामस्थांनी बदनामी नको म्हणून चक्क बैठका देखील घेतल्याचे पुढे आले. मुलीच्या नात्यातील व्यक्तींना घटना समजल्यानंतर त्यांनी थेट पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांना संपर्क केला. त्यानंतर शिरूर कासार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. चार दिवस घरात वेदना असाह्य झाल्यानंतर अखेर मुलीच्या आईने उपचारासाठी बीड गाठले आणि सध्या पीडित चिमुरडीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पीडियत मुलीच्या नात्यातीलच एका नराधमाने हे कुकर्म केल्यामुळे बदनामी नको म्हणून पीडित कुटुंबालाच गावकऱ्याकडून धमकी देण्यात येत होती. या संपूर्ण संतापजनक घटनेची आपबीती सांगत असताना पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले. दरम्यान, पोस्कोमधला गुन्हा तात्काळ नोंदवून घेतला पाहिजे गुन्हा नोंद करून घेण्यास दिरंगाई करणे हा देखील गुन्हाच आहे. त्यामुळे शिरूर कासार पोलिसांवर देखील या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी बालकल्याण समितीचे सदस्य तत्वशील कांबळे यांनी केली आहे. तसेच, नातेवाईकांकडून आणि गावकऱ्यांकडून गुन्हा न दाखल होण्यासाठी दबाव होता, पण मुलीची आई मॅनेज झाली नाही. आईने गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर, याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. मात्र, 90 टक्के प्रकरणात दबाव टाकून पोलीस स्टेशनपर्यंत येऊच दिले जात नसल्याचेही कांबळे यांनी सांगितले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.