मनोज जरांगेंना पाहताच मुंडे कुटुंबीयांना अश्रू अनावर; पाटलांचा मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींना फोन
बीड : मस्साजोगचे सरपंच दिवंगत संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणानंतर बीड (Beed) जिल्ह्यात महादेव मुंडे यांच्या हत्येचं प्रकरण समोर आलं. त्यानंतर, मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सातत्याने पोलीस प्रशासनाला आरोपींना अटक करा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार, अखेर ज्ञानेश्वरी मुंडेंनी (Dyaneshwari munde) तीव्र आंदोलन करत आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. त्यामुळे, आता मराठा आंदोलक मनोज जरेंग पाटील यांनी परळीत जाऊन दिवंगत महादेव मुंडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक (ओएसडी) यांच्यासमवेत त्यांनी फोनवर चर्चाही केली.
मनोज जरांगे पाटील यांनी परळी येथे मुंडे कुटूंबीयांच्या निवासस्थानी भेट घेत संवाद साधला. यावेळी मुंडे कुटूंबीयांना अश्रू अनावर झाले होते. माध्यमांशी संवाद साधतांना जरांगे पाटील म्हणाले, एक बांधव सांगतोय की मांसाचा तुकडा नेवून टेबलवर ठेवला, मुंडे कुटूंबीयांनीही आरोप केले आहेत तरी देखील आरोपी अटक होत नाहीत. महादेव मुंडे यांचा खून होऊन 21 महिने उलटले तरी देखील तपास लागला नाही, मुख्यमंत्र्यांना गुंडच पोसायचे आहेत का, आता या प्रकरणात येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त करावी. अन्यथा बीडसह राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. या प्रकरणात जे कोण पोलिस अधिकारी, कर्मचारी होते त्यांचे कॉल डिटेल्स देखील तपासायला हवेत. आता मी या प्रकरणात लक्ष दिले आहे, काय-काय होते ते तुम्हाला दिसेल, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. तसेच, येत्या 25 तारखेपर्यंत एसआयटी नियुक्त न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, मनोज जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींसोबत फोनवरुन चर्चा देखील केली.
आता तपासाला गती येईल वाटते – मुंडे
मुख्यमंत्र्यांना बोलून 25 तारखेच्या अगोदर एसआयटी आणि सीआयडीच्या संदर्भात प्रयत्न करतो असे आश्वासन मनोज दादांनी दिले आहे. मनोज दादांनी आरोपीला अटक करण्यासंदर्भात सरकारला सूचना देतो असे सांगितल्याचे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.आता, तपासाला गती येईल असं वाटत आहे. आरोपी अटक केले तर महाराष्ट्र बंद करण्याची वेळ दादांना येऊ द्यावी लागणार नाही. माझ्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांनी रास्ता रोकोचं निवेदन दिलेलं आहे. सरकारने तात्काळ आरोपींना अटक करावी एवढीच मागणी सरकारकडे आहे, असेही ज्ञानेश्वरी यांनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.