Beed News – राजकीय वैमनस्यातून तरुणावर प्राणघातक हल्ला, नगरसेवकाच्या इशार्‍यावरून जबर मारहाण केल्याचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राजकीय वैमनस्यातून एका 29 वर्षीय तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली. परळी वैजनाथ-चांदापूर रोडवरील नायरा पेट्रोल पंपाजवळ हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तरुणाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय फॅक्चर झाले असून डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. जुन्या भांडणाच्या व राजकीय वादाच्या रागातून हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे.

अभिजीत नागेश नागोराव कांबळे (29) असे जखमी झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आनंद विलास कांबळे, सुरेश चौंडे, रतन आदोडे, संतोष इंदरकर उर्फ बन्नी, रोहन उर्फ गब्बर साळवे, दत्ता कुरूप आणि इतर तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी मिळून हा हल्ला केला. हा सर्व प्रकार नगरसेवक नितीन रोडे याच्या सांगण्यावरून आणि आदेशावरून झाल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

फिर्यादी चांदापूर रोडवरील पेट्रोल पंपासमोरील एका चहाच्या हॉटेलवर बसला असता आरोपींनी त्याला गाठले. आरोपींनी लोखंडी रॉड आणि कोयत्याने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण सुरू असताना आरोपींनी नितीन रोडे याला व्हिडिओ कॉल केला, ज्यावर त्याने फिर्यादीला जिवे मारण्याचा आदेश दिला. जखमी तरुणावर सध्या अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचण यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू करण्यात आला असून तपास अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक नितीन गट्टूवार हे काम पाहत आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments are closed.