प्रहार संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षाकडून शासकीय रुग्णालय पेटवून देण्याची धमकी; भंडाऱ्यात गुन्हा
भंडारा : पत्नी आणि मुलाच्या मृत्यूस वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत विवेक शहरे यांनी लाखांदूर ग्रामीण रुग्णालयासमोर मागील महिन्यात आमरण उपोषण केलं. हे उपोषण सोडवून देण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या बच्चू कडूंच्या (बच्चू कडू) प्रहार संघटनेचे भंडारा जिल्हा उपाध्यक्ष जयेंद्र देशपांडे यांचा वैद्यकीय अधिकारी डॉ दत्तात्रय ठाकरे यांच्याशी वाद झाला. या वादात जयेंद्र देशपांडे यांनी डॉ.ठाकरे यांना ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी देत त्यांना शिवीगाळ केली. यानंतर वारंवार फोन करून डॉक्टरला त्यांच्या मित्राच्या माध्यमातून हे प्रकरण थांबविण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप डॉक्टर ठाकरे यांनी केलाय.
Bhandara Crime News : ग्रामीण रुग्णालय पेटवून देण्याची धमकी देत त्यांना शिवीगाळ
या गंभीर प्रकरणाची तक्रार डॉ. ठाकरे यांनी केली होती. पोलिसांनी तपासानंतर या प्रकरणी लाखांदूर पोलिसांनी बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष असलेल्या जयेंद्र देशपांडे यांच्या विरोधात कलम 308 (2), 132, 296, 352, 356,351(2) या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या या घटनेचा अधिक तपास लाखांदूर ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गद्रे करीत आहे.
दिव्यांगांसाठी असलेले वैश्विक ओळखपत्र सादर न केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे 12 कर्मचारी निलंबित
दिव्यांगांसाठी असलेले वैश्विक ओळखपत्र सादर न केल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या बारा कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांनी ही कारवाई केली आहे. निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये दहा शिक्षक आणि दोन अभियंत्यांचा समावेश आहे. दिव्यांग विभागाचे प्रधान सचिव तुकाराम मुंडे यांनी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. त्याप्रमाणे चंद्रपूर जिल्हा परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची तपासणी प्रक्रिया राबवली होती. या प्रक्रिये दरम्यान अनेक वेळा संधी देऊन देखील वैश्विक ओळखपत्र सादर न केलेल्या बारा कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबित करण्यात आलेल्या 12 कर्मचाऱ्यां व्यतिरिक्त वैश्विक दिव्यांग ओळखपत्र सादर न करणारे आणखी काही कर्मचारी संशयाच्या भोवऱ्यात आहे.
छत्तीसगडच्या पोलीस वाहनाला भरधाव ट्रकची भीषण धडक
छत्तीसगड राज्यातील डोंगरगड येथील पोलीस कर्मचारी पोलिसांच्या स्कार्पिओ वाहनाने नागपूरच्या दिशेनं जात असताना पाठीमागून आलेल्या एका भरधाव ट्रकनं त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातात एका महिला पोलीस उपनिरीक्षकासह तीन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. ही घटना भंडाऱ्याच्या मानेगाव सडक येथील एका पेट्रोलपंपासमोर घडली. या पेट्रोल पंपावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात ही थरारक घटना कैद झाली आहे. हे पोलीस कर्मचारी डोंगरगड इथं दाखल असलेल्या एका पोक्सो गुन्हाच्या तपासाकरिता नागपूरकडे जात असताना हा अपघात घडला. रामेश्वरी बघेल (41), रोजलीन सामीयल (40), सोमेश साहू (25) असं गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांचं नावं आहे. याप्रकरणी लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.