मंत्रि‍पदाचा कोट मिळाला, पण पालकमंत्री तटकरे झाल्या, गोगावलेंच्या 32 समर्थकांचे राजीनामे

भरतशेट गोगावले, रायगड: राज्यातील पालकमंत्र्यांची यादी काल जाहीर झाली. त्यानंतर या निर्णयाचे कुठे चांगले तर कुठे वाईट पडसाद उमटले. रायगडचा पालकमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष असतानाच या यादीत रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले (Bharatshet Gogawale) यांना डच्चू मिळाल्याने गोगावले समर्थक प्रचंड आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते एवढ्यावरच न थांबता या कार्यकर्त्यांनी रात्रीपासून महाड जवळील मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला. आज सकाळींदक्षिण रायगड जिल्ह्यातील एकूण 32 गोगावले समर्थक आणि पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या पदाचे तडकाफडकी राजीनामे देखील दिलेत. यामुळे आता माहितीयुतीतील पालकमंत्री पदाचा वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे.

दुसरीकडे सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाबाबत शिर्डीमध्ये मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावरून सुनील तटकरे हे पालकमंत्री पदासाठी आदिती तटकरे यांची वर्णी लावण्यासाठी ठाम असल्याच पहायला मिळालं. मात्र रायगड मधील संतप्त शिवसैनिकांचा राग शांत करण्यासाठी आणि दिलेले राजीनामे मागे घेण्यासाठी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतील हे पाहणं औत्सुक्याचे राहील.

राज्यातील पालकमंत्री पदाची यादी काल  जाहीर झाली. यानंतर भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज आहेत. आज भरत गोगावले यांनी त्यांच्या रायगड मधील शिवनेरी निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याच आवाहन केलं.तर  प्रशासनाला कोणत्याही स्वरूपात गालबोट लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितलं. मात्र कार्यर्कत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देण्याचा निर्णय घेतल्याने जिल्ह्यात शिवसेनेत खळबळ उडाली आहे.आपल्याला रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळालं नाही  म्हणून एवढी काळजी करू नका तुमचे माझ्यावर अनंत उपकार आहेत आणि ते मी कधीच विसरणार नाही अशा शब्दात भरत गोगावले यांनी संतापलेल्या शिवसैनिकांची मन जिंकली. भरत शेठ हा तुमचा शेठ आहे मी ईतर कोणाचा शेठ नाही असं भावनिक आवाहन करत भरत गोगावले यांनी कार्यकर्त्यांना यावेळी शांत केलं. पालकमंत्री पदाच्या निर्णयावर माझी वरिष्ठ मंडळींसोबत चर्चा सुरू आहे.

शिवेनेरीवरील या बैठकीला जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामे दिले आहेत. यात जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, महिला जिल्हाप्रमुख निलिमा घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके, महाड तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, पोलादपूर तालुकाप्रमुख रवींद्र तरडे, माणगावचे तालुकाप्रमुख  महेंद्र मानकर, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, पोलादपूरचे तालुकाप्रमुख नीलेश आहिरे, रोह्याचे तालुका प्रमुख अॅड. मनोजकुमार शिंदे यांच्यासह पाचशे हून अधिक शिवसैनिकांचा समावेश आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nagpur News: नागपुरात सरसंघचालकांविरोधात युवक काँग्रेसचं आंदोलन; संघ मुख्यालयाकडे जाताना आंदोलकांना पोलिसांनी अडवलं

अधिक पाहा..

Comments are closed.