Birthday Special: विराट कोहलीचे ते 10 रेकॉर्ड, जे मोडणे अशक्य!

भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली आज (५ नोव्हेंबर) आपला ३८ वा वाढदिवस साजर करत आहे. त्याने आपल्या वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध ७४ धावांची खेळी केली. बुधवारी (४ नोव्हेंबर) न्यूझीलंड विरुद्ध भारत पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. त्यादरम्यान स्टेडिममध्ये उपस्थित असलेल्या अनेकांनी विराटला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानेही चाहत्यांचे आभार मानले.

विराटने अनेक सामन्यांमध्ये लक्षवेधी कामगिरी करून भारताला विजय मिळवून दिले आहेत. तो मागील १८ वर्षांहून अधिक काळापासून हे करत आहे. यादरम्यान त्याने अनेक विक्रम मोडले आणि रचले आहेत. विराट महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे असे काही विक्रम मोडेल, ज्याची कल्पनाही केली नव्हती. त्याने आपल्या जबरदस्त फलंदाजीने चाहत्यांकडून किंग आणि चेजमास्टर ही टोपणनावे मिळवली.

विराटचे असे काही विक्रम जे मोडणे अशक्य..
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतके
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत ५५ शतके झळकावली असून २०२३ मध्ये सचिनला मागे टाकून त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला.

एकाच एकदिवसीय विश्वचषकात सर्वाधिक धावा
एकदिवसीय चषकाच्या एकाच आवृत्ती सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही विराटच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये सहा अर्धशतके आणि तीन शतकांसह ७६५ धावा करून हा विक्रम केला.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५००० धावा
विराटने सप्टेंबर २०२६ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये १५००० धावांचा टप्पा गाठला. याबरोबर तो एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद १५००० धावा करणारा खेळाडू ठरला. सचिननंतर १५००० धावांचा टप्पा गाठणारा विराट हा केवळ दुसरा खेळाडू आहे.

भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार
विराटची कसोटी कर्णधार म्हणून कारकिर्द उत्तम राहिली आहे. त्याने फलंदाजीबरोबर चांगले नेतृत्व करून भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या उंचीवर नेले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका (बीजीटी) जिंकली, जे भारताच्या कसोटी इतिहासात पहिल्यांदाच होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ६८ सामन्यांपैकी ४० कसोटी सामने जिंकले, तर १७ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला.

कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी द्विशतके
विराट कसोटी क्रिकेटमधून २०२५ मध्ये निवृत्त झाला. त्याच्या नावावर कसोटी कर्णधार म्हणून सर्वाधिक द्विशतके (५) करण्याचा विक्रम आहे.

८००० ते १५००० धावा सर्वात जलद
एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वात जलद ८००० ते १५००० धावा करण्याचा विक्रम विराटच्याच नावावर असून, हा टप्पा गाठणे कोणत्याही खेळाडूसाठी कठीण आहे.

एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके
विराटने एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके केली आहेत. त्याने आतापर्यंत दुसऱ्या डावात फलंदाजी करताना ३० शतके झळकावली आहेत.

एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा
ऑकलंडमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यादरम्यान विराट एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. ही कामगिरी करताना त्याने सचिनला मागे टाकले. सचिनने एकदिवसीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना ८७२० धावा केल्या होत्या, तर विराटने ८७४१ धावा केल्या आहेत. हा विक्रमही इतर फलंदाजांना मोडणे अशक्य आहे.

सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर पुरस्कारांचा विक्रमही विराटच्या नावावर, त्याने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत २२ वेळा हा पुरस्कार जिंकला आहे.

विराट सर्वाधिक आयसीसी (१०) पुरस्कार जिंकणारा खेळाडू आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियामध्ये कोणत्याही परदेशी फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये १२ शतके झळकावली आहेत.

एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा
विराट एका आयपीएल हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. त्याने २०१६ च्या आपीएलमधील १६ सामन्यांमध्ये चार शतके आणि ७ अर्धशतकांच्या सहाय्याने ९७३ धावा केल्या होत्या.

Comments are closed.