..ते कुठेही गेले तरी हाताला काही लागणार नाही; गोरेंनी शिंदे भेटीवरुन मोहिते पाटलांना डिवचलं
सोलापूर: भाजपने (BJP) काँग्रेसच नाही तर जिल्ह्यातील अनेक प्रस्थापितांची शक्तीस्थळे उध्वस्त केली असून आता आधार शोधायचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असे म्हणत एकनाथ शिंदेंची भेट घेणार्या खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपरोधात्मक टीका केली. दोनच दिवसापूर्वी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Mohite patil) यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचे फोटो समाज माध्यमात व्हायरल झाले होते. तर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी शिंदेसेनेचे मंत्री उदय सावंत आणि भरत गोगावले यांची भेट घेतल्याचे फोटोही समोर आले होते. त्यावरून, जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर निशाणा साधला.
जे सुपडा साफ करायची वल्गना करत होते त्यांचा सुपडा भाजपने साफ केला. ते कुठेही गेले तरी हाताला फार काही लागण्यासारखे नाही. मात्र, हा आधार शोधण्याचा शेवटचा प्रयत्न असू शकतो, असा टोला जयकुमार गोरे यांनी शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांना लगावला. भारतीय जनता पक्षाने इथली त्यांची सर्व शक्तीस्थळे उद्ध्वस्त केली आहेत, त्यांना जो न्यूनगंड होता की आम्ही म्हणजेच जिल्हा, आम्ही म्हणजेच जिल्हा परिषद आणि आम्ही म्हणजेच महापालिका. आम्ही काही करू शकतो ही त्यांची धारणा धुळीला मिळविली आहे, असेही गोरेंनी म्हटले.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करताना, ताईंनी अशाच पद्धतीने पक्षाचे काम करुन राहिले साहिले असेल ते सगळं निकाली काढावं. सोलापूर जिल्ह्यात एकट्या काँग्रेसचाच नाही तर इतर प्रस्थापितांचाही भाजपने सुपडा साफ केला आहे. अनेक मोठे प्रस्थापित त्यांच्या मतदारसंघापुरते तर काहीजण त्यांच्या जिल्हा परिषद गटापुरते मर्यादित उरले आहेत. याच्यापुढे त्यांचे कुठे अस्तित्व राहिले नाही, असा टोला जयकुमार गोरे यांनी लगावला. आता, यातून ते काहीतरी नव्याने शिकतील आणि लोकांच्या हिशोबाचे राजकारण करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे दोन्ही खासदार निवडून आले असून आमदारही 5 निवडून आले आहेत. मात्र, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत आमदार, खासदारांच्या गडाला सुरुंग लावल्याचं दिसून आलं. त्यामुळे, आता सत्तापक्षातील जवळकीतेवरुन जयकुमार गोरेंनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना डिवचलं.
हेही वाचा
मोठी बातमी! भाजपच्या रितू तावडेंचं महापौरपद सव्वा वर्षातच जाणार; समोर आलं महायुतीचं राज’कारण’
आणखी वाचा
Comments are closed.