‘बोध कीर्तन’ तुरुंगवासाचा एखाद्या विपश्यनेप्रमाणे विचार करून मांडणारे पुस्तक – उद्धव ठाकरे
बोध कीर्तन तुरुंगवासाचा एखाद्या विपश्यनेप्रमाणे विचार करून मांडणारे पुस्तक, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. शिवसेना नेते, खासदार, दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे प्रकाशन आज झाले. याप्रसंगी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांच्या प्रमुख उपस्थित या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी बोलता उद्धव ठाकरे असे म्हणाले आहेत.
भाषणाची सुरुवात करता उद्धव ठाकरे म्हणाले की, “शेवटच्या वक्त्यांची नेहमी पंचायत असते, कारण चांगला स्कोर झालेला असतो आणि शेवटचे प्लेअर म्हणजे मनिंदर सिंग वगैरे, ओव्हर पूर्ण करायच्या असतात. मला खात्री आहे की, माझ्याप्रमाणे तुम्हालाही एक आश्चर्याचा धक्का, शॉक नाही, तर धक्का बसला असेल. हा विषय वेगळा आहे की, संजय राऊत असं काही लिहू शकतात. संजय राऊत यांची पत्रकारिता आपण पाहिली आहे. राज ठाकरे, तुम्ही त्यांचा सामनापर्यंतचा प्रवास सांगितलात. सामनानंतर जो प्रवास होता किंवा आहे, अनेकदा असं व्हायचं की सकाळी मी चहा पीत असताना इंटरकॉम वाजायचा. त्यावेळी इंटरकॉम म्हणजे नक्कीच साहेबांचा. त्यावेळी इंटरकॉम वाजला की समजायचं की, सामनात काहीतरी गडबड झाली आहे. ती गडबड अग्रलेखात नसायची; मात्र बातम्या डबल आल्या आहेत, असं काहीतरी झालेलं असायचं किंवा हेडिंगमध्ये काहीतरी झालेलं असायचं. इंटरकॉम उचलल्यानंतर तो सगळा रागाचा धबधबा आणि मग हा आहे कुठे? जास्त शहाणा समजतो… वगैरे… वगैरे. जरा बघ कुठे आहे, सांग त्याला. मग मी संजय राऊत यांना फोन करायचो की, संजय, जरा प्रॉब्लेम आहे. जरा बोलून घे. थोड्या वेळाने संजय राऊत यांचा फोन यायचा आणि मग साहेबांचा, काहीच नाही, कुठे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे आधी त्यांच्यावरचा राग हा माझ्यावर यायचा आणि तो एकदा राग शांत झाल्यानंतर संजय हे आपले गुणाचे पुतळे! दुसऱ्या दिवशी ते काहीतरी करायचे, पुन्हा मला ऐकावं लागायचं. पण एक गोष्ट खरी आहे की, घुसणं आणि घुसवणं यामध्ये फरक आहे. अंबरीश मिश्र, तुम्ही जे म्हणालात की, संजय राऊत अंतरंगात घुसतात आणि ते जाणून घेतल्यानंतर दुसऱ्याच्या… घुसवतात. कट्यार काळजात घुसली, तसं. या दोन्ही गोष्टी त्यांना चांगल्या जमतात. मागे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, अक्षरांचे शब्द होतात, शब्दांच्या ओव्या पण होतात आणि शब्दांच्या शिव्याही होतात. आता या दोन्ही शब्दांचं सामर्थ्य संजय राऊत यांच्याकडे पुरेपूर आहे की, कोणाकडे काय करायचं; ओव्या कुठे म्हणायच्या आणि शिव्या कुठे द्यायच्या, कोणाला द्यायच्या, हे त्यांनी बरोबर साधलं आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले की, “या पुस्तकाबद्दल मी वेगळं काही सांगत नाही, कारण अंबरीश मिश्र आणि राज ठाकरे यांनी सांगितलं आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकात एक चांगलं लिहिलं आहे की, मी का लिहितो? आणि हळूहळू लिखाण कसं नाहीसं होत चाललं आहे. काही दिवसांनी अक्षरं, पेनं हे म्युझियममध्ये जातील की काय, अशी शंका आहे आणि ती खरी आहे. कारण आताची पिढी मोबाईलवर जितकी फास्ट टायपिंग करू शकते… नाही, आता सगळं काही मोबाईलवरतीच येतं. काही प्रश्न विचारायचे झाले की, चॅट-जीपीटी आहे. पण त्याच्यावरचं ज्ञान असं असतं की, माणूस चाट पडतो. की, अरे हे कसं काय? एवढं हे विचित्र असतं. मोबाईलमध्ये आपण एवढे बुडालेले असतो की, पूर्वी एक शब्द होता- बाईलवेडा. आता सगळे मोबाईलवेडे झालेले आहेत. कुठेही गेलं तरी सगळ्यांना आपल्या हातात मोबाईल पाहिजेच. शब्द जसे म्युझियममध्ये जातील, त्याचप्रमाणे आपली विचारशक्तीही म्युझियममध्ये जाईल. कारण विचार करायला वेळ आहे कुठे? लोकांचा असा एक गैरसमज आहे की, मी आणि राज ठाकरे खूप वाचतो. आम्ही वाचतो कमी, पण मला असं वाटतं की आम्ही वाचवतो बरंच! दोन्ही गोष्टी आम्हाला कराव्या लागतात आणि वाचवण्याच्या नादामध्ये अनेकदा वाचायचं राहून जातं. मग जे काही वाचतो, त्याला आम्ही वाचन म्हणतो आणि आपलं पुढे जात असतो. अंबरीश मिश्र, तुम्ही आज मराठी भाषिकांना नेमकं काय पाहिजे, हे सांगितलं आहे. शब्दांचं महत्त्व आणि सामर्थ्य हे कसं असतं, कसं असायला पाहिजे, हे आज आपण विसरत चाललो आहोत.
ते म्हणाले, “एका बाजूला आपण मराठीचा आग्रह धरतो, तो धरलाच पाहिजे. पण त्यासाठी शुद्ध मराठी आली पाहिजे. नाहीतर, शुद्ध मराठी येत नसेल, तर उपयोग काय त्याचा? मराठीमध्येसुद्धा अशा गमतीजमती आहेत की, पु. ल. देशपांडे म्हणायचे की, ज्याला इंग्रजीमध्ये नर्वस सिस्टीम म्हणतो, त्याला मराठीत मज्जासंस्था म्हणतात. तिकडे ते नर्वस असतात, आपण मज्जासंस्था म्हणतो. या गमतीजमती आहेत. पु. ल. देशपांडे यांचं आणखी आठवतंय मला वाचलेलं की… पूर्वी रेडिओवरती श्रुतिका व्हायच्या आणि त्यामध्ये महिलांसाठी खास विशेष श्रुतिका असायच्या. मग विषय काय असायचे की, “आता अमुक-अमुक आणि अमुक-अमुक या दोघींमधला कुटुंब नियोजन या विषयावरचा परिसंवाद ऐका.” आणि मग तो परिसंवाद ऐकल्यानंतर ती निवेदिका सांगायची, “आत्ताच आपण अमुक-अमुक आणि अमुक-अमुक यांच्यामधील कुटुंब नियोजन यावरचा परिसंवाद ऐकला. आता यांच्याकडून ऐका, बाळाला मोजे कसे शिवावेत.” पुढे लिहिले की, आता कुटुंब नियोजन ऐकल्यानंतर बाळाला शिव्या मोजाव्या की यांना शिव्या मोजाव्या! हे शब्द थोडे इकडे-तिकडे केले की त्याचा अर्थ कसा छान, गमतीशीर होतो, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे.”
उद्धव ठाकरे म्हणाले, “आता हळूहळू या सगळ्या गोष्टी दुरापास्त होत चाललेल्या आहेत; कारण ओव्यांची सुरुवात कुठून झाली, कीर्तनाची सुरुवात कुठून झाली, हे आपल्या कोणालाच माहिती नाहीये. बोध देणारं कोणी राहिलेलं नाहीये, मग तो बोध घेणार कोणाकडून? आणि त्यात संजय, तू बोध कीर्तन हे जे पुस्तक लिहिलंस, ते खूप मोठं काम केलंय. कारण त्यामध्ये कोणतंही पान उलगडलं तरी त्याला अनुक्रमणिका नाहीये. असं कदाचित या प्रकारातलं हे पहिलंच पुस्तक असेल, अखिलजी. आणि तुमचं सुद्धा अभिनंदन की तुम्ही अनुक्रमणिका न बघता पुस्तक छापून टाकलं. अनुक्रमणिकाच नाही, कुठलही पान कधीही काढा. भले एका पानावर चारच ओळी आहेत, पण त्या चार ओळींमध्ये एक-एक पुस्तक आहे, एवढा त्यामध्ये अर्थ भरलेला आहे. आता जुन्या ज्या काही गोष्टी होत्या, मी जे सांगत होतो की पूर्वी दळण हे जात्यावरती दळलं जायचं आणि ते दळता दळता ओव्या गायल्या जायच्या. आता जाती गेली, जात राहिली. ओव्या गेल्या आणि जातीवाचक शिव्या राहिल्या! आपण सगळे कोणत्या दिशेने चाललेलो आहोत? कारण आमची विचार करण्याची वेळच काढून टाकली गेलेली आहे. सतत आता ते सांगितलं ना, एक प्रेमिक कसा असतो, तसे मोठमोठे मोह आपल्या समोर येतात. आपण त्या मोहांना बळी पडतो आणि मोहाला बळी पडून दुःखाला आमंत्रण देतो. आमचं काम काय? रोज काही ना काहीतरी, इकडे लढ, तिकडे लढ! कुठे पॉवर प्रोजेक्ट येतोय, तिकडे झाडं तोडतायत, तिकडे जा. इकडे अमुक होतंय, तिकडे जा. कुठे खून होतोय, कुठे काय होतंय. आता राज ठाकरे, तू, आदित्य ठाकरे, आपल्याला माहिती आहे. संजय राऊत तुम्ही पण गेला होतात कर्जतला, तिथे तो प्रोजेक्ट येतोय. आता येताना मी वाचलं, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाच्या वेशीवरती अदानीचा मोठा २१००० मेगावॅटचा प्रोजेक्ट येतोय. चला जा, पुन्हा तिकडे आंदोलन करा. मग काय सोडलेलंच नाहीये! तुम्ही विचार करूच नका. वाचणार कधी तुम्ही? वाचण्याची आता वेळच राहिलेली नाहीये; कारण वाचायला तुम्हाला वेळ शिल्लकच ठेवलेला नाहीये. रोज काहीतरी तुमच्यावरती असं आदळून टाकायचं की आपली विचारशक्तीच मारत जायची. आणि अशी ही सगळी विचारशक्ती मरत असताना तरीदेखील आपण एवढ्या मोठ्या संख्येने या पुस्तकासाठी इकडे आलात.”
ते म्हणाले “मला कल्पना आहे, घंटी वाजायच्या आधी भाषण संपवलं पाहिजे. घंटीला वेळ आहे अजून. आठची वेळ आहे. माणूस प्रामाणिक आहे, जास्त बोलत नाही, नाहीतर खरोखर घंटी वाजेल. आणि अंबरीश मिश्र, तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की सगळे गेले तरी आम्ही चार राहू, कारण आमच्यासमोर इलाजच नव्हता. अंबरीश मिश्र आमचा मित्र आणि राज ठाकरे यांनी जसं सांगितलं की, ते शिवसेनाप्रमुखांवरचं फोटोबायोग्राफीचं पुस्तक अंबरीश मिश्र यांनी लिहिलेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना थांबण्याशिवाय पर्याय नाही आणि बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम मी अंबरीश मिश्र यांना दिलंय, त्यामुळे मलाही थांबण्याशिवाय पर्याय नाही. पण याचा अर्थ असा की, अंबरीश मिश्र यांच्यासारखी व्यासंगी, ज्ञानी आणि अनुभवाचे बोल अधिकाराने सुनावणारी पत्रकार मंडळी आता फार कमी राहिलेली आहेत. बाळासाहेब ज्याप्रमाणे अंबरीश मिश्र यांना फोन करायचे, तसं मी सुद्धा त्यांना फोन करत होतो. काहींचा आणि माझा फोन थांबला, पण अंबरीश मिश्र यांच्या बरोबर थांबलेला फोन पुन्हा सुरू झाला. काही जणांचा फोन २०१९ पासून थांबला, तो थांबलाच. तर जास्त काही न बोलता मी एवढेच सांगेन, अखिलजी तुम्हाला खास धन्यवाद देतो. हे पुस्तक अप्रतिम आहे. परत परत वाचत राहावं, असं हे पुस्तक आहे. आणि त्यामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत, त्या फार महत्त्वाच्या आहेत, लढायचं केव्हा हे त्यात दिलेलं आहे आणि थांबायचं कधी हेही त्यात दिलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्या आयुष्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या आहेत.”
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “संजय राऊत तुम्ही हे पुस्तक लिहिल्याबद्दल मी असं नाही म्हणणार की तुम्ही अशी आणखीन पुस्तकं लिहावीस; नाहीतर कदाचित लोक म्हणतील की पुढचं साहित्य संमेलन आपण येरवड्याला घेऊ! तसं नाहीये, तुरुंगात जाणं ही काय गमतीची गोष्ट नाहीये. पण त्या तुरुंगातल्या नरकामध्ये सुद्धा स्वर्ग शोधण्याचं काम संजय राऊतच करू शकतात. तुरुंगवासाचा एखाद्या विपश्यनेप्रमाणे विचार करून, असं पुस्तक लिहू शकणारे, हे मला वाटतं एकटे संजय राऊत आहेत. त्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. असंच तुमचं चिंतन, मनन, लिखाण आणि भाषण अधिकाधिक प्रभावी होत राहो. आपण सगळे एकत्र आहोत. मनापासून शुभेच्छा!”
Comments are closed.