बोधनकरांपासून बोध कीर्तनापर्यंतचा संजय राऊत यांचा प्रवास; राज ठाकरे यांचे जबरदस्त भाषण

मुंबईतील दादरमध्ये शिवसेना नेते, खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले.यावेळी सभागृहात तुडुंब गर्दी झाली होती. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या लेखन आणि कारर्किर्द प्रवासाची माहिती दिली. यावेळी पोलीस अधिकारी बोधनकरांपासून बोध कीर्तनापर्यंतचा संजय राऊत यांचा प्रवास झाला आहे. हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी असल्याचे राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांचे तडाखेबंद आणि जबरदस्त भाषण झाले.

यावेळी राज ठाकरे म्हणाले की, अंबरिश मिश्र यांनी उत्तमपणे विचार मांडले. त्यांच्या लिखाणाच्या गठ्ठ्याकडे मेहता यांचे लक्ष होते. याचे चांगले पुस्तक होऊ शकते, असा विचार त्यांच्या चेहऱ्यावरच दिसत होता.मराठी भाषा कशी बोलली पाहिजे, कशी लिहीली पाहिजे, यावर त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले.

न्यायालयाची नोटीस वाचल्यानंतर नेमके मला धरलंय की सोडलंय तेच कळत नाही, अशाप्रकारची ती भाषा असते. भाषा कशी असावी, ते संजय राऊत यांच्या या पुस्तकातून दिसून येते. राऊत आणि आपली ओळख अनेक वर्षांची आहे.ते अनेकदा आपल्या वडिलांना भेटण्यासाठी यायचे. त्यावेळी ते मार्मिकमध्ये लिहीत होते. त्यानंतर आमची मैत्री झाली, असे राज ठाकरे म्हणाले.

संजय राऊत लोकप्रभाला होते, त्यावेळची एक गोष्ट आहे. संजय राऊत त्यावेळी गँगवॉरच्या खऱ्या गोष्टींसाठी नावाजले होते. त्या खऱ्या गोष्टी जबरदस्त होत्या. त्याचवेळी सामना सुरू झाला होता. संजय राऊत म्हणायचे की, हा काय सामना, संपादक बाळासाहेब ठाकरे त्यांच्या नावाला ही अशी मुळमुळीत भाषा शोभते का, असे ते म्हणायचे. त्यावेळी त्यांचे सामनाबाबत असे विचार होते, असे राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

संजय राऊत यांना एकदा हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांची मुलाखत हवी होती. त्यांनी मला विचारले. मी बाळासाहेबांना मुलाखतीबाबत विचारले, त्यावेळी बाळासाहेब तयार नव्हते. मात्र, नंतर ही मुलाखत ठरली. त्यासाठी मी, राऊत आणि बाळासाहेब आम्ही शिवसेना भवनमध्ये बसलो होतो. त्यावेळी राऊत यांनी असे काही प्रश्न विचारले की, बाळासाहेबांनी राऊत यांना मुलाखती दरम्यानच शिव्या घातल्या. दुसऱ्या दिवशी त्या शिव्यांसह त्यांनी ही मुलाखत प्रसिद्ध केली. त्यावेळी बंदे मे दम है, अशी बाळासाहेबांची भावना होती. आपल्याला मिळालेल्या शिव्याही प्रसिद्ध करण्याची हिंमत असावी लागते, ती राऊत यांनी दाखवली. त्यामुळे त्याचवेळी बाळासाहेबांनी राऊत यांना सामनाचे संपादक करण्याचा विचार ठेवला.१९९२ मध्ये राऊत सामनाचे कार्यकारी संपादक झालो. राऊत यांचा पोलीस अधिकारी बोधकनकरांपासून सुरू झालेला प्रवास बोधकीर्तन पर्यंत आला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

बोध कीर्तन हे पुस्तक उत्तम आहे. त्यातील एका कविताही राज ठाकरे यांनी वाचून दाखवली.ती वाचल्यावर ते २०१४ कँपेन आहे, असे वाटते. तसेच अनेक छोट्या पण मोठी बोध देणाऱ्या अनेक गोष्टी त्यात आहेत. त्यामुळे हे पुस्तक सर्वांनी आवर्जून वाचावे, असे आहे. राऊत यांनी सांगितले की, अशी पुस्तके तुरुंगात राहूनच निर्माण होऊ शकतात. त्यांच्याकडून अशी अनेक पुस्तके निर्माण व्हावीत, मात्र, ती तुरुंगाबाहेर राहूनच त्यांनी निर्माण करावी, असेही राज ठाकरे मिश्कीलपणे म्हणाले.

Comments are closed.