महाराष्ट्रात प्रत्येक पुस्तकाचा उत्सव साजरा व्हावा; संजय राऊत यांचे प्रतिपादन

महाराष्ट्रात प्रत्येक पुस्तकाचा उत्सव साजरा व्हावा असे विधान शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात केले. दादर येथील ब्राह्मण सहाय्यक संघात आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, लेखक अमरीश मिश्र आणि मेहता पब्लिशिंग हाऊसचे अखिल मेहता उपस्थित होते.

यावेळी पुस्तकाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, ब्राह्मण सहाय्यक संघामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय, हॉल लहान पडतोय खरं आहे. खालीसुद्धा लोक उभे आहेत. मगाशी अंबरीश मिश्रजींना मी सांगत होतो की, आपण सगळे उत्सव साजरे करतो. खाण्याचे उत्सव, खाद्य उत्सव, कपड्यांचे उत्सव; पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पुस्तकाचासुद्धा एक उत्सव साजरा व्हावा म्हणून मी माझ्या प्रत्येक पुस्तकाचा कार्यक्रम करतो. पुस्तकाचे कार्यक्रम हे मुंबईत महाराष्ट्राच्या राजधानीत होणं गरजेचं असतं. या निमित्ताने आपण सगळे मराठी लोक एकत्र येतो, चर्चा करतो, ऐकतो, संवाद साधतो. लोक वाचतात ठीक आहे; पण अजूनही या महाराष्ट्रामध्ये मराठी साहित्य, विविध प्रकारचं मराठी साहित्य, मग कविता असेल, सांस्कृतिक असेल, ललित असेल, नाटक असेल, यासाठी लोक येतात, जमतात हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला वारंवार अशा कार्यक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे.

आता हे जे ‘बोध कीर्तन’ आहे, याचं नाव जेव्हा ठरलं तेव्हा हे खूप आध्यात्मिक वाटतंय असे म्हटले. मी म्हटलं का संजय राऊत आध्यात्मिक असू शकत नाहीत का? ते रोज सकाळी दहा वाजता कीर्तनच करत असतात, प्रबोधनच करत असतो आम्ही दिवसभर. उत्तम वक्ता हा उत्तम कीर्तनकार असावा लागतो, लक्षात घ्या. त्याच्याकडे सांगण्यासारखं जर असेल तरच तो उत्तम कीर्तन करतो आणि त्याच बुवाला आणि महाराजाला जास्त श्रोते लाभतात असे यावेळी राऊत म्हणाले.

यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, मी सतत वाचत असतो आणि विचार करत असतो आणि त्याच्या नोंदी करत असतो. तर आता या सगळ्याचं करायचं काय? आणि मला मी नेहमी सांगतो, मला तुरुंगातले जे १०५ दिवस मिळाले. कामच नाही मग करायचे काय? अधूनमधून लेखकांना तुरुंगात पाठवायला पाहिजे, उत्तम साहित्य निर्माण होईल. उत्तम साहित्य हे जगभरातल्या तुरुंगातच निर्माण झालेलं आहे. आपण जे वीर सावरकर वाचत असू, टिळक वाचत असू, जयप्रकाश नारायण असतील, स्टॅलिन असेल, लेनिन असेल या सगळ्यांचं उत्तम पैकी उत्तम साहित्य आणि कविता या तुरुंगात निर्माण झाल्या. तुमच्यावरती कुणावर तुरूंगात जायची वेळ येऊ नये; पण लेखकावर यावी. क्रांतीची ठिणगीच तिकडे पडते.

या पुस्तकातल्या बऱ्याचशा गोष्टी या तुरुंगातल्या वेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. पण मीडियाने काय घेतलं याच्यामध्ये तर विजय मल्ल्याची गोष्ट. ज्या कोठडीत आम्हाला ठेवलं होतं, तर त्याच्या बाजूला एक सुंदर कोठडी होती. असं वाटलं हा टू बीएचके हॉल आहे. आम्ही सारखं जेलरला सांगायचो, अरे आम्हाला तिकडे शिफ्ट करा. त्यावेळेला विजय मल्ल्यासाठी, नीरव मोदी वगैरे येतील लंडनवरून. हा आम्हाला त्यांना तिथे दाखवावा लागतो तिकडल्या कोर्टाला. बघा आमच्याकडची जी तुरुंगाची परिस्थिती आहे ती किती मानवी हक्कांचं पालन करणारी आहे. पण आम्हाला का तिथे आतमध्ये? आम्ही जायचो, फिरायचो. पण विजय मल्ल्या याच्यावरती आपण लिहायला पाहिजे. यावर अधिक बोलताना राऊत म्हणाले, सकाळपासून मीडिया दाखवतेय संजय राऊतांनी मोदींचं कौतुक केलं. मोदी काय माझे व्यक्तिगत शत्रू आहेत? नाहीये. त्यांचं एक भाषण मला आवडलं. ते अयोध्येमध्ये राम जन्म प्राणप्रतिष्ठा करण्याच्या दिवशी त्यांनी एक भाषण केलं. मी ते ऐकलं. तेव्हा पण मी तुरुंगातच होतो. ते मी तिथे लिहून काढलं आणि म्हटलं भाषण चांगलं केलंय त्यांनी आणि समोर टेलिप्रॉम्प्टर आहे का हे मी चेक करत होतो. टेलिप्रॉम्प्टर नव्हता. म्हटलं अरे उस्फूर्त केलं असेल भाषण. तर हे अराजकीय भाषण जे आहे, हे त्यांचा आतापर्यंतच्या भाषणातला एक चांगला नमुना आहे. तो याच्यात मी टाकलाय. पण लोकांना वाटतं मी मोदींची स्तुती केली.

या पुस्तकाविषयी अधिक बोलताना राऊत म्हणाले, माणूस जेव्हा सतत वाचत असतो आणि वाचताना त्याच्यावरती चिंतन करत असतो, तेव्हा अनेकदा आपल्या डोक्यात ते विषय चाचपडत राहतात. मग त्याचं करायचं काय? मग माझ्यासारखा माणूस अशा असंख्य गोष्टी लिहून काढतो. माझ्या मुली इकडे आहेत, विधिता आणि पूर्वशी. या पुस्तकाच्या आयडिया त्यांची. त्यांनी मला एक पुस्तक दिलं, ‘कम्फर्ट बुक ‘ मॅट हेगचं आणि म्हटलं हे अशा प्रकारचं तू पुस्तक तयार कर, कम्फर्ट बुक. आणि साधारण त्या पद्धतीने ते पुस्तक तयार झालेलं आहे. आता लोकांना असं वाटेल की संजय राऊत इतक्या नाजूक पद्धतीने कसं लिहू शकतात? मी पण माणूस आहे. आपल्यालाही भावना असतात. आपल्यालाही कविता आवडतात. देशातले उत्तम कवी माझे मित्र आहेत. ग्रेस तर आमच्या सामनात येऊन बसायचे. ग्रेससारखे कवी माझ्या केबिनमध्ये येऊन तासनतास बसायचे, आम्ही चर्चा करायचो. असे अनेक कवी, अनेक साहित्यिक, अनेक लेखक यांच्याशी आम्ही कायम संवाद केला. आणि त्यातलं काही एकत्र करून या पुस्तकामध्ये लोकांसाठी देण्याचा आम्ही प्रयत्न केला. वाचकांनाही कळलं पाहिजे की आम्ही काय वाचलंय आणि तुम्ही काय वाचायला हवं. आणि त्या सगळ्याचं जे निर्माण झालेलं आहे ते ‘बोध कीर्तन’ आहे. बोध घ्या, कीर्तन म्हणून समजा किंवा अन्य काही समजा; पण माणसांनी वाचलं पाहिजे.

आज सकाळी मी सुंदर कविता वाचली आणि मला असं वाटलं, जर ही कविता मला आधी मिळाली असती, उर्दूतली तर मी तिचा या पुस्तकामध्ये समावेश केला असता. इतकी सुंदर कविता मी समाजमाध्यमांवर टाकली. कवी म्हणतो, शम्सी मीनाई नावाचा कवी आहे लखनऊचा. आपल्याला माहित असेल मिश्र, एक ओळी सांगतो त्याने काय सांगितलंय,

'आपल्या देशात सर्व काही आहे'
भाकरी नसेल तर?
आपल्या देशात सर्व काही आहे
भाकरी नाही तर काय
वचन पाळ
लंगोट नाही तर काय?

हे आजच्या राजकारणावरचं विदारक भाष्य. आणि अशा सगळ्या गोष्टी माझ्याकडे मी टिपण्याचा प्रयत्न केला आहे.

'अधिकाऱ्यांचा पाऊस आहे, अधिकाऱ्यांचा पाऊस आहे, प्रत्येक गल्लीबोळात कार्यालय आहे.
कवी अली सुखनवर गेली गली
सॉक्रेटिस ते बद्र
सुकरात म्हणजे सोक्रेटीस… गल्लोगल्ली सोक्रेटीस आहे, चाणक्य आहे आपल्याकडे सुकरात दरबदर है सिकंदर गली गली, सिकंदर सुद्धा गल्लोगल्ली.

'आपल्या देशात सर्व काही आहे, मग ती भाकर नाही तर काय, वचन गुंडाळा, लंगोटी नसेल तर काय.'

ही आपल्या आजच्या देशाची खरी परिस्थिती आहे. सगळे काही चाणक्य आहेत, विद्वान आहेत, साहित्यिक आहेत, लेखक आहेत, सोक्रेटीस आहेत, सिकंदर आहेत, नेपोलियन आहेत. नकली आहेत; पण या देशामध्ये जर भाकरी नसेल तर काय? ठीक आहे, लोक हे सण साजरे करत असतात. अशा अनेकविध गोष्टी या पुस्तकामध्ये मी टिपण्याचा प्रयत्न केला. मला खात्री आहे, आतापर्यंत मराठी वाचकांनी माझ्या पुस्तकाचं बऱ्यापैकी स्वागत केलेलं आहे. हे पुस्तकसुद्धा आपल्याला आवडेल, आपण त्याचं स्वागत करा.

मी उद्धव साहेबांचा आणि राज साहेबांचा आणि अंबरीशजींचा आभारी आहे. ते इथे राजकारणी म्हणून आलेले नाहीत. ते उत्तम वाचक आहेत. ते छान वाचत असतात, वाचल्यावर चर्चा करत असतात. त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या वक्तव्यामध्ये अनेक वाचनातले तुम्हाला संदर्भ सापडतील. अशा प्रकारची राजकारणातली वाचन संस्कृती आहे, ही टिकवण्याचं काम उद्धवजी आणि राज करत असतात. म्हणून एक पुस्तकप्रेमी म्हणूनसुद्धा इथे आलेले आहेत. अंबरीश मिश्र आपल्या सगळ्यांचे लाडके लेखक. ते सुद्धा आले आणि अखिल मेहता, आपला आभार आहे की त्यांनी सुंदर पुस्तक काढलं. एका लेखकाला काय हवं असतं? त्याचं पुस्तक उत्तम निघावं, लोकांपर्यंत जावं. आपली ती यंत्रणा आहे, आपण उत्तम करताय.

Comments are closed.