संजय राऊत यांच्या लेखणीत अल्पाक्षरी ताजेपणा आणि ताकद; अंबरीश मिश्र यांच्याकडून ‘बोध कीर्तन’ पुस्तकाचे कौतुक
पुस्तकाचे प्रकाशन हा केवळ लेखक आणि प्रकाशकासाठी आनंदाचा क्षण नसतो, तर सर्वाधिक आनंद मराठी भाषेला होत असतो. संजय राऊत यांनी वाचकांना एक सुंदर, प्रसन्न आणि टवटवीत पुस्तक दिले आहे. त्यांच्या लेखणीत अल्पाक्षरी ताजेपणा आणि ताकद आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ लेखक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यांनी संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ या पुस्तकाबद्दल बोलताना गौरवोद्गार काढले.
संजय राऊत यांच्या ‘बोध कीर्तन’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलताना अंबरीश मिश्र यांनी पुस्तकाच्या आशयासह राऊत यांच्या लिखानाच्या शैलीवरही भाष्य केले. या वेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांशी आपली मैत्री असल्याचे सांगत त्यांनी मिश्कील टिप्पणी केली. ‘राजाची मिरवणूक लांबून बघावी, या एका कारणासाठी मी इथे हजर आहे,’ असे ते म्हणाले. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या काही शेरोशायरी सादर करत सद्यस्थितीवर भाष्य केले.
संजय राऊत यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य सांगताना मिश्र म्हणाले की, राऊत यांची कारकीर्द अतिशय गजबजलेली आहे. त्यांनी अनेक महत्त्वाचे प्रसंग जवळून पाहिले आहेत. त्यांच्या लिखाणात एक अल्पाक्षरी ताजेपणा आणि ताकद आहे. राऊत यांचे अग्रलेख वाचून बाळासाहेब ठाकरे यांचे अंतरंग जाणून घेता आले. हा राऊत यांचा परकाया प्रवेश होता. बाळासाहेबांचे विचार आत्मसात करून राऊत यांनी त्यांचे अनुसरण केले ; केवळ अनुकरण केले नाही.
२२७ पानांचे हे ‘बोध कीर्तन’ हे पुस्तक अतिशय रोचक असून त्याची भाषा सुबोध आणि निवेदन ओघवते आहे. लिखाण जाडजूड असण्यापेक्षा शिडशिडीत असावे. पुस्तकात भरपूर मजकूर असूनही ते कुठेही कंटाळवाणे होत नाही. या पुस्तकात आग्रह नाही, दुराग्रह नाही किंवा काहीतरी खोडून काढण्याची घाई नाही. हे पुस्तक स्वतःमध्ये छान गुंतलेले आहे, असे निरीक्षण त्यांनी यावेळी नोंदवले. माणसाने इमानाने जगले पाहिजे. सामान्य माणसे विपरीत परिस्थितीशी झुंजत असतात. त्यांच्या जगण्यातील संघर्ष समजून घेणे महत्त्वाचे आहे, असेही मिश्र म्हणाले. संजय राऊत यांचे हे पुस्तक इंग्रजी भाषेतही आले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी या पुस्तकाचे वर्णन मित्रासारखे असल्याचे केले.
पुस्तक प्रकाशनाच्या प्रक्रियेचे महत्त्व विशद करताना मिश्र म्हणाले, ‘पुस्तकाचे प्रकाशन म्हणजे बंदिस्त छापखान्यातील खिळे मोकळे होण्याचा क्षण. पुस्तकाच्या लेखकाला आणि प्रकाशकाला आनंद होतोच; पण सर्वाधिक आनंद मराठी भाषेला होतो.’ दुर्गाबाई भागवत यांच्याशी संबंधित आठवण सांगताना पुस्तकाच्या निर्मितीमागे अनेकांची मेहनत असते. पुस्तकाच्या बाळंतपणासाठी पाच-सात सुईणी राबत असतात, असे ते यावेळी म्हणाले.
भाषेच्या बदलत्या स्वरूपावर चिंता व्यक्त करताना त्यांनी वर्तमानपत्रांमधून अनेक सुंदर शब्द हद्दपार होत असल्याचे सांगितले. भाषा जिभेच्या टोकावर असते. ती सतत बोलली गेली पाहिजे. भाषेचा वापर वाढला तरच ती समृद्ध होईल. ‘लोकार्पण’ हा शब्द चुकीचा असल्याचे सांगत त्यांनी मराठी भाषेतील शब्दांच्या योग्य वापराकडेही लक्ष वेधले.
Comments are closed.