बोपदेव घाटाच्या उतारावर टेम्पोने विद्यार्थ्यांना चिरडले; तिघांचा मृत्यू, दोघे जखमी, ट्रिनिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला
बोपदेव घाटाच्या तीव्र उतारावरून सुसाट आलेल्या आयशर टेम्पोने स्कूलबसची प्रतीक्षा करत रस्त्याच्या कडेला थांबलेल्या विद्यार्थ्यांना चिरडले. आधी कारला जोरदार धडक देणारा टेम्पो नियंत्रण सुटल्याने थेट विद्यार्थ्यांमध्ये घुसला. या भीषण अपघातात ट्रिनिटी कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. येवलेवाडी-बोपदेव घाट रस्त्यावर हा अपघात झाला. याप्रकरणी येवलेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
विशाल दांगडे आणि मोहिनी चौधरी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर सिद्धेश राजे याला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले. श्वेता तळेकर आणि सोहम घंगाळे हे अपघातात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी प्रतीक चव्हाण (22) या चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
बोपदेव घाटाकडून येवलेवाडीच्या दिशेने आयशर टेम्पो भरधाव वेगाने येत होता. येवलेवाडीकडून बोपदेव घाटाकडे जाणाऱया रस्त्यावरील बस थांब्याजवळ ट्रिनिटी कॉलेजचे 20 ते 25 विद्यार्थी बसची प्रतीक्षा करत उभे होते. बस थांब्यापासून सुमारे 50 मीटर अंतरावर वाहतूक संथ होती. त्याच वेळी घाटाच्या उतारावरून भरधाव आलेल्या टेम्पोने पुढे चाललेल्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. अनियंत्रित झालेला टेम्पो थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या बस थांब्याकडे गेला आणि तेथे थांबलेल्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात घुसल्याची माहिती येवलेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांनी दिली.
Comments are closed.