रब्बीची ‘धडधड’ आता प्रकल्पांतील पाण्यावर, उत्तर महाराष्ट्रात अनेक तालुक्यांना टँकरचा आधार, धुळे जिल्ह्यातील सिंचनासाठी अक्कलपाडा धरणासह सहा प्रकल्पांतील पाण्याचे नियोजन
पावसाने दिलेला दगा उत्तर महाराष्ट्रात रब्बी हंगामाच्या मुळावर उठला असून धुळे जिह्यातील शेतकऱयांची सर्व गणितेच चुकली आहेत. सरकारने केलेले नियोजन कागदी घोडे ठरल्याने सिंचनाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. नाशिकमध्येही परिस्थिती वेगळी नसून पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱयाचाही प्रश्न गंभीर आहे. नोव्हेंबरमध्येच सहा तालुक्यांत साठ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून ही संख्या डिसेंबरअखेर मोठय़ा प्रमाणात वाढवावी लागणार आहे. गंगापूर धरण समूहातील घटलेला साठा लक्षात घेता येत्या काही महिन्यांत शहरातील पाणी पुरवठय़ात कपात होणे अटळ आहे.
धुळे जिह्यातील धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री या चारही तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती आहे. रब्बी हंगामाच्या क्षेत्रातदेखील घट झाली आहे. हिरवा चारा उत्पादित होणार नसल्याने जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न आहे. चारा-पाण्याअभावी दुग्ध व्यवसायही संकटात आहे.
येवला तालुक्यातील 27 गावे, 55 वाडय़ांना सर्वाधिक 29 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगावमधील 9 गावे, 53 वाडय़ांना 12; देवळ्यातील 5 गावे, 21 वाडय़ांना 6; मालेगावातील 6 गावे, 14 वाडय़ांना 6; चांदवड तालुक्यातील 6 गावे, 3 वाडय़ांना 5, तर सिन्नर तालुक्यातील 2 वाडय़ांना 2 टँकरद्वारे पुरवठा केला जात आहे.
पावसाने ओढ दिल्याने खान्देशातील शेतकरी मोठय़ा आर्थिक संकटात सापडला आहे. दरवर्षी एकरी दहा क्विंटल कापसाचे उत्पादन घेणाऱया शेतकऱयांच्या हाती एक क्विंटल तरी कापूस लागेल का हा प्रश्न आहे. मी यंदा चार एकरावर कापूस लावला आहे. आता मायबाप सरकारने बघ्याची भूमिका घेऊ नये. – आनंदा पाटील, शेतकरी, धुळे शिवार
नाशिक, जळगाव जिल्ह्यांना पोखरा योजना लागू आहे. मात्र कायम दुष्काळी असणाऱया धुळे जिह्याला त्यातून वगळले आहे. जोपर्यंत बोरिंग रिचार्ज होणार नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणार नाही. सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नसल्याने गाडय़ांच्या ताफ्यांवरील उधळपट्टी थांबलेली नाही. – अनिल गोटे, माजी आमदार, धुळे
Comments are closed.