अनधिकृत होर्डिंग्ज हटवणे शक्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल करा; हायकोर्टाकडून सरकारची खरडपट्टी
अनधिकृत होर्डिंग्ज वरून मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांची खरडपट्टी काढली. अधिकारी अकार्यक्षम असतील तर त्यांना पदावरून हटवा असे सुनावत न्यायालयाने सरकारच्या कार्यपद्धतीवर आज ताशेरे ओढले. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास आम्ही अपयशी ठरलोय अशा आशयाचे एका ओळीचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश हायकोर्टाने राज्याच्या मुख्य सचिवांना दिले.
शहरात अनधिकृत होर्डिंग्ज लावली जात आहेत. त्यामुळे शहरे बकाल होत असून याप्रकरणी सुस्वराज्य फाऊंडेशन व इतर काही जणांच्या वतीने हायकोर्टात ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर यांच्या मार्फत याचिका दाखल करण्यात आली आहे. तर न्यायालयीन आदेशांच्या अवमानप्रकरणी अॅड. नितेश भुतेकर व अॅड. मनोज काsंडेकर यांनी मध्यस्थी याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर आज बुधवारी न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती अजय शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील बी. व्ही. सामंत यांनी माहिती देताना खंडपीठाला सांगितले की, न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत; मात्र पालिका प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
मंत्रालयाच्या परिसरात होर्डिंग्ज
आजही मंत्रालयाच्या परिसरातही पन्नास-साठ होर्डिंग्ज लटकताना दिसतात ती तुम्ही हटवू शकत नाहीत, असे सरकारला फटकारत अधिकाऱयांच्या नाकर्तेपणावर न्यायालयाने सरकारला जाब विचारला. तसेच या प्रकरणावरील सुनावणी खंडपीठाने चार आठवडय़ांपर्यंत तहकूब केली.
Comments are closed.