नेमारला पुन्हा दुखापत अन् सांबा फुटबॉल चिंतेत
फुटबॉल विश्वचषकाच्या महासंग्रामाला अवघे 20 दिवस बाकी असताना ब्राझीलचा सुपरस्टार नेमार पुन्हा जखमी झाला आहे. सँटोसचा 34 वर्षीय आक्रमक खेळाडू पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीमुळे सान लोरेन्झोविरुद्धचा कोपा सुदामेरिकाना सामना खेळू शकला नाही आणि ब्राझीलच्या चाहत्यांची धाकधूक वाढली. मात्र सँटोसचे डॉक्टर रोड्रिगो झोगैब यांनी नेमारची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट केले. 27 मे रोजी ब्राझीलच्या सराव शिबिरासाठी तो सज्ज असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. डेपोर्टिव्हो कुएन्काविरुद्धच्या पुढील सामन्यात त्याच्या पुनरागमनाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
ब्राझीलसाठी सर्वाधिक 79 आंतरराष्ट्रीय गोल करणाऱ्या नेमारने अखेरचा सामना ऑक्टोबर 2023 मध्ये उरुग्वेविरुद्ध खेळला होता. त्या लढतीत त्याच्या गुडघ्याचे एसीएल फाटले आणि त्यानंतर दुखापतींनी त्याची पाठच धरली. बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनचा माजी स्टार असलेल्या नेमारला सँटोसमध्ये पुनरागमनानंतर 38 सामन्यांत फक्त 17 गोल करता आले आहेत.
Comments are closed.