नवी मुंबईत शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण, एकनाथ शिंदेंना निमंत्रणच नाही; मानापमानाचे उड्डाण

मुंबई : राज्याच्या राजकारणात राजकीय पक्षांमध्ये कायमच धुसफूस किंवा शीतयुद्ध पाहायला मिळते. त्यातूनच, अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या साताऱ्यातील दरे गावी गेल्यानंतर ते नाराज असल्याची चर्चा होते. मात्र, आज नवी मुंबईत (Navi mumbai) झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रणच देण्यात आले नाही. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री तसेच सिडकोचे अध्यक्ष म्हणून एकनाथ शिंदे यांना निमंत्रण द्यायला हवे होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमंत्री आदिती तटकरे यांना निमंत्रण देण्यात आले. पण, एकनाथ शिंदे यांना कार्यक्रमाची कल्पना देखील नाही. त्यामुळे, शिंदेंना जाणूनबुजून निमंत्रण दिले नाही की, अनावधानाने निमंत्रण द्यायचे राहून गेले याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मात्र, यामुळे महायुतीमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते संपन्न झाले. आज शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, हा पुतळा साकारणारे शिल्पकार नितीन गोर्डे यांचाही मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, नवी मुंबई विमानतळास दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात आम्ही आग्रही आहोत, असेही फडणवीसांनी म्हटले. मात्र, या सोहळ्यास दोन्ही उपमुख्यमंत्र्‍यांची अनुपस्थिती राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली.

नवी मुंबई एयरपोर्ट प्रशासनाने आजचा हा कार्यक्रम आयोजित केला होता, विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना देखील आजच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्यामुळे, विमानतळा कार्यक्रमावरुन महायुतीमध्ये मानापमानाचे उड्डाण रंगल्याची चर्चा होत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याला चक्क उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनाच निमंत्रणच नसल्यामुळे महायुतीमध्ये पुन्हा एकदा राजकीय तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. .

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडकोने उभारलं आहे, नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदे या विभागाचे मंत्री असतानाही त्यांना विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रणच देण्यात आलेले नाही. यासंदर्भात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ संचालन कंपनी अदानी यांच्याकडून दुजाभाव झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यात राजकीय हस्तक्षेप होऊन जाणूनबुजून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावलण्यात आले का? असा प्रश्नं राजकीय वर्तुळातून विचारला जात आहे. दरम्यान, या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झाल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा

मोठी बातमी! एसीबीच्या एकाच दिवशी दोन धाडी, जालन्यात चक्क तहसीलदार रंगेहात जाळ्यात, 6 लाखांची घेतली लाच

Comments are closed.