नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा

मुंबई : नागपूर हिंसाचाराच्या घटनेवरुन चांगलंच राजकारण तापलं असून विरोधकांनी सरकारला लक्ष्य केलं आहे. सरकारमधील काही मंत्री बेताल आणि समाजात तेढ निर्माण करणारे वक्तव्य करत आहेत. त्यामुळेच,नागपूरमधील हिंसाचाराची घटना घडल्याचं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे. तर,काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही देवेंद्र फडणवीस सरकारचा कारभार हा औरंजेबासारखाच असल्याचं या घटनांवरुन सिद्ध होत असल्याची म्हटलं आहे. मात्र, आता भाजपकडून सपकाळ यांच्यावर पलटवार करण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रावसाहेब दानवे यांनी नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवर भाष्य करताना थेट काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांच्या वक्तव्यामुळेच नागपूरसारखी घटना घडल्याचे दानवे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे, आता पुन्हा वेगळाच राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं होतं.

औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या जोरदार राजकारण तापलं असून नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत. महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षांनी नागपूरच्या घटनेवरुन सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सरकारवर होत असलेल्या टीकेला भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी नागपूरच्या घटनेला काँग्रेसचा जबाबदार असल्याचे म्हटले. नागपूरमधील घटनेला काँग्रेसच जबाबदार आहे. कारण, काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीची तुलना थेट औरंगजेबासोबत केली होती. सपकाळ यांचं हे वक्तव्य चुकीचं असून त्यांच्या या वक्तव्यामुळेच नागपूरची घटना घडल्याचा दावा रावसाहेब दानवे यांनी केला. तसेच, नागपूरच्या घटनेचा मी निषेध करतो, मात्र महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नाही पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

औरंंगजेबाशी तुलना योग्य नाही – वडेट्टीवार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना औरंगजेबाशी करत टीका केली होती. याच मुद्यावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, ते काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मतांशी फारकत घेतांना दिसले. मी हर्षवर्धन सपकाळ हे काय बोलले ऐकलं नाही. मात्र देवेंद्र फडणवीस असो कि आणखी कोणी असो, कोणाची अशी औरंगजेबाशी तुलना करणे योग्य नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

हेही वाचा

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना

अधिक पाहा..

Comments are closed.