रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु: अरविंद शिंदे
पुणे : नाशिकमधील अशोक खरात या भोंदूबाबानं महिलांवर अत्याचार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. या सर्व प्रकरणानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिल्याचं देखील समोर आलं आहे. या सर्व प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्याबाबत पुणे काँग्रेसमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतं. पुणे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी रुपाली चाकणकर यांची बदनामी करु नका असं म्हटलंय. तर, पुणे शहर काँग्रेसच्या महिला आघाडीकडून चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
रुपाली चाकणकर यांची पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पाठराखण केली आहे. रुपाली चाकणकर यांची बदनामी करू नका, गरज पडल्यास त्यांना काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करू, असं म्हटलंय अरविंद शिंदे यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे पुणे शहर काँग्रेसच्या महिला आघाडीकडून उद्या रूपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे काँग्रेसची नेमकी भूमिका कोणती आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. रूपाली चाकणकर यांची काँग्रेसचे शहराध्यक्ष पाठराखण करतायत आणि दुसरीकडे काँग्रेसची महिला आघाडी रूपाली चाकणकर यांच्या विरोधात पाहायला मिळतेय.
काँग्रेस मधली अंतर्गत गटबाजी अनेकदा समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत का असा प्रश्न कायम उपस्थित होतो. हाय कमांडकडून वेगळे आदेश येतात आणि शहराध्यक्षांचं मत वेगळंच असतं. त्यामुळे कायम कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. असंच काहीस रुपाली चाकणकर यांच्या प्रकरणात देखील दिसून आलं आहे. एकीकडे अरविंद शिंदे यांनी रूपाली चाकणकरांची पाठराखण केली तर दुसरीकडे महिला आघाडी मात्र आक्रमक होऊन आंदोलन करणार आहे. त्यामुळे पुणे शहर काँग्रेसमध्ये नेमकं काय चाललंय असा प्रश्न उपस्थित होतो.
अरविंद शिंदे यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी अरविंद शिंदे यांची ही भूमिका वैयक्तिक असल्याचं सांगितले. रूपाली चाकणकर यांच्याबाबत काँग्रेस विरोधात आहे. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा झालाच पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई देखील झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे.
अतुल लोंढे यांनी फेसबुक पोस्ट काय केली आहे?
अरविंद शिंदेंनी रुपाली चाकणकरांच्या संदर्भात जी भूमिका मांडली ती त्यांच वैयक्तिक मत आहे. काँग्रेस पक्षाची भूमिका अगदी स्पष्ट आहे. महाराष्ट्राचा एपस्टीन खरात याने जे काही कृत्य केलेलं आहे ते माफीला लायक नाही. रुपाली चाकणकरांचा आणि त्यांचा संबंध स्पष्टपणे दिसतोय. चाकणकर यांच्यावर या महाराष्ट्रातल्या महिलांच्या सुरक्षेची आणि त्यांच्या काळजीची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीपासून त्या दूर झालेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. त्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे, असं काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.